दिल्ली-उत्तराखंड महामार्गावर निर्भया कांडची पुनरावृत्ती झाली आहे. दिल्लीहून देहराडूनच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. ही खळबळजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत बसच्या चालक, वाहकासह 6 जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता उत्तर प्रदेशमधील मुराबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती अनाथ आहे. सदर घटनेने ती हादरून गेली असून तिची मानसिक स्थितीही बिघडली आहे. 12 ऑगस्टच्या रात्री साडे बारा वाजता दिली दिल्लीच्या आयएसबीटीहून उत्तराखंड रोडवेज बसने देहराडून येथे पोहोचली होती. यादरम्यानच तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
अत्याचाराची माहिती समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सध्या अहवालाची प्रतिज्ञा असल्याचे एसएसपींनी सांगितले. याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रकरणी आयएसबीटीस्थित सरोजिनी सीडब्ल्यूसीचे पर्यवेक्षकांनी सांगितले की, 13 ऑगस्टला पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास एक मुलगी गोंधळलेल्या स्थितीत आढळली. तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसून आले. तिच्या शरिरावर जखमा किंवा रक्तस्रावाच्या खुणाही दिसून आल्या नाहीत. मात्र अंतर्गत दुखापतींबाबत माहिती नाही. सध्या तिला वेलफेअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.