
>> निळकंठ कुलकर्णी
।। श्री गुरूदेव दत्त ।।
दत्तप्रभूंनी कित्येक संतांना गिरनार याच ठिकाणी साक्षात दर्शन दिले आहे. अनादिकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफांमध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज यांसारख्या संतांना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.
ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्वर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर , मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर, अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते . तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला 10 ते 12 लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिद्धांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेव्हा उतरतात. त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बापूंचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे. आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरू शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल. याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते.
लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि.मी आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मिरी बापूंचा आश्रम आहे. श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे 150 वर्षाच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रद्धा आहे, याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या ताप पवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. वाटेत जाता विविध इतर ही स्थाने आहेत.
पायऱ्या चढायला सुरुवात करताच अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरनार चढण्यासाठी सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिकदृष्टया चढणे अशक्य वाटते, त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात. डोलीवर एका व्यक्तीसाठी 5 हजार ते 11 हजार रुपये घेतात. सुमारे 2000 पायऱ्यांवर सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू संतांमध्ये त्यांचा मान खूप मोठा होता. 2 हजार पायऱ्यावर वेलनाथ बाबा असा फलक दृष्टीला पडतो हे ही एक सिद्धस्थान आहे अस सांगतात.





























































