
बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला असतानाच आता गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्नही सुटणार आहे. त्याबाबत आज राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मिलच्या चाळीतील रहिवासी आणि प्रिंग मिल व्यवस्थापनामध्ये संयुक्त बैठक झाली.
प्रिंग मिल चाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन करावे असे मॅनिटरी कमिटीने निर्देश दिलेले असतानाही मिल व्यवस्थापन पुनर्वसनासाठी टाळाटाळ करत असल्याचे रहिवाशांनी स्पष्ट केले. रहिवाशांना 30-35 हजार रुपये भाडे द्यावे, कॉर्पस फंड 50 हजार रुपयांऐवजी रहिवाशांच्या मागणीचा विचार करून वाढ करून द्यावा यावर चर्चा झाली. तसेच पुढील 15 दिवसांत आपण सदनिकांचा अंतिम करारनामा तयार करून चर्चेसाठी यावे, असे निर्देश जितेंद्र आव्हाड यांनी प्रिंग मिल व्यवस्थापनाला दिले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर, माजी महापौर-नगरसेविका श्रद्धा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, प्रिंग मिल चाळ भाडेकरू संघाचे वकील ऍड. संदेश इनामदार, सूर्यकांत मुळ्ये, भाडेकरू संघाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
























































