74 हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा द्या ! माथेरानमध्ये आंदोलन

न्यायालयाच्या आदेशानुसार निसर्गरम्य माथेरानमधील 74 हातरिक्षाचालकांना लवकरात लवकर ई-रिक्षा द्याव्यात या मागणीसाठी कुटुंबासह आंदोलन करण्यात आले. हातरिक्षाचालकांच्या कुटुंबाने दिवसभर उपोषण करीत आपला संताप व्यक्त केला. माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असलेल्या माथेरानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हातरिक्षा धावतात. या अमानवी कृत्यातून आमची सुटका करावी, अशी मागणी या चालकांनी केली आहे. न्यायालयीन लढाईनंतर ई-रिक्षा चालवण्यास परवानगी देण्यात आली. पण सनियंत्रण समितीच्या आडमुठेपणामुळे सर्व हातरिक्षाचालकांना अद्यापि न्याय मिळालेला नाही. सध्या फक्त २० ई-रिक्षा माथेरानमध्ये धावतात. पण पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या ई-रिक्षांची संख्या अतिशय कमी आहे.

लेखी आश्वासन
माथेरानमध्ये एकूण 94 हातरिक्षा असून सर्व चालकांनी ई-रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. या सर्वांच्या हाती ई-रिक्षा द्याव्यात अशी प्रमुख मागणी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर जयश्री गोरे, दिव्या रांजणे, दिया वाघेला, अनिता चावरे, वैशाली गोरे अरुणा कदम, वैशाली दळवी, अंबालाल वाघेला, नागेश कदम, शुभम चावरे आदींनी उपोषणाचे हत्यार उपसले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच न्यायालयात लवकरच याप्रकरणी सुनावणी होणार असून त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले आहे.