निवडणुकीत पैसे वाटले तसे आम्हाला पैसे वाटता काय? वारकऱ्यांचा मिंधे सरकारला संतप्त सवाल

तीन चाकांवर ढकलगाडी करणाऱ्या मिंधे सरकारने लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले. त्याप्रमाणे आता  विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून 20 हजार रुपयांच्या अनुदानाच्या स्वरूपात वारकऱ्यांना पैसे वाटता काय, असा संतप्त सवाल वारकरी आणि दिंडीप्रमुखांनी मिंधे सरकारला केला आहे. तसेच अशा पद्धतीने अनुदान देऊन सरकारने वारकरी आणि दिंडय़ांची अवहेलना करू नये, अशा शब्दांत वारकऱ्यांनी सरकारला सुनावले आहे. असे तुटपुंजे अनुदान देण्यापेक्षा सोयीसुविधा द्याव्यात. अपघात कसे टाळता येतील त्यादृष्टीने प्रयत्न करा, असे वारकऱ्यांनी सरकारला खडसावले.

फिरते दवाखाने उभारा

वारकऱ्यांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. दिंडी मुक्कामी पाण्याची सुविधा, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी फिरते दवाखाने, स्वच्छतागृहांची संख्या मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करून द्यावी.

ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज कदम (कीर्तनकार)

आरोग्याविषयी नावीन्यपूर्ण योजना राबवा

अनुदान देऊन सरकारने वारकरी आणि दिंडीप्रमुखांची अवहेलना करू नये. त्यापेक्षा वारकऱ्यांच्या आरोग्याविषयी नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवाव्यात.

– ह.भ.प. संजय महाराज शिंदे (गायक, श्री क्षेत्र आळंदी देवाची)

दर्जेदार मूलभूत सुविधा द्या

निवडणुकीत पैसे वाटले त्याप्रमाणे दिंडीप्रमुखांना पैसे देऊ नयेत. ते पैसे आमच्या खिशातच जाणार आहेत. त्यापेक्षा वारकऱ्यांना दर्जेदार अशा मूलभूत सुविधा द्याव्यात. टँकरऐवजी शुद्ध पाणी द्यावे, उत्तम स्वच्छता, शौचालयाची व्यवस्था करावी. पालखी मार्ग देहूरोड ते पंढरपूर असा असून तो देहूगाव ते पंढरपूर व्हावा. वारकरी वर्षातून अनेकदा पंढरपूरला जातात. त्यावेळी त्यांच्या वाहनांना टोल द्यावा लागतो. तो माफ करावा.

संतोष महाराज काळोखे देहूकर, दिंडीप्रमुख, वै. महादेव बोवा गेणुजी काळखो (मुकादम) सांप्रदायिक दिंडी.

ही तर थट्टाच!

पालखी सोहळय़ाला तब्बल 700 वर्षांची परंपरा असून आजतागायत कोणत्याही देणगी स्वरूपातील मदतीवरून सोहळय़ाची आर्थिक गणिते ठरवली जात नाहीत. त्यामुळे सरकारने जाहीर केलेले 20 हजार रुपयांचे अनुदान ही वारकऱ्यांची थट्टा आहे.

ह.भ.प. गौतम वाकले (दिंडीप्रमुख)

अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा

पालखी सोहळय़ात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात. यादरम्यान अनेकांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू होतो. असे अपघात टाळण्यावर सरकारने भर द्यायला हवा. अनुदान देण्याऐवजी दिंडीतील वारकऱ्यांचा विमा उतरवायला हवा. अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी.

– ह.भ.प. मुपुंद महाराज काळे (श्री क्षेत्र आळंदी देवाची)

निष्काम कर्मयोग धोक्यात आणू नका

आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी।। येर तुमचे वित्त धन। मज मृतिकेसमान।। या जगद्गुरू तुकोबारायांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाचा वारकरी पुरस्कर्ता आहे. त्यामुळे राज्य शासनाने दिंडय़ांना रोख स्वरूपात अनुदान देऊन वारकरी संप्रदायाचा निष्काम कर्मयोग धोक्यात आणून, बाजारीकरणास प्राधान्य दिल्यासारखे होईल. अनुदान देण्यापेक्षा दिंडय़ांना वाढीव पोलीस संरक्षण, शुद्ध पाणी, विश्राम कक्ष, मुबलक पाण्यासह शौचालय इत्यादी पायाभूत सुविधा द्याव्यात.

– रामकृष्ण हनुमंत महाराज वीर,राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी संप्रदाय पाईक संघ