
गोवा चॅलेंजर्स संघाने किताबी लढतीत गतविजेत्या चेन्नई लायन्सवर 8-7 असा थरारक विजय मिळवित इंडियन ऑईल अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेतील चौथ्या हंगामाचे विजेतेपद पटकाविले. हिंदुस्थानचा आघाडीचा टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेता अलव्हारो रॉब्लेस हे या जेतेपदाचे शिल्पकार ठरले.
बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. गोवा चॅलेंजर्सने अंतिम सामन्यात गतविजेत्या चेन्नई लायन्सचे आव्हान 8-7 अशा फरकाने परतवून लावले. गोवा चॅलेंजर्सचे हे पहिले जेतेपद ठरले. विजेत्यांना चषकासह 75 लाखांचे बक्षीस देऊन इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपविजेत्या चेन्नई लायन्सला 50 लाखांचे पारितोषिक मिळाले.
हिंदुस्थानचा आघाडीचा खेळाडू हरमीत देसाईने पुरुष एकेरीच्या पहिल्या लढतीत 2-1 अशा फरकाने बेनेडिक्ट डुडाचा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला दमदार सुरुवात करून दिली. लीगमध्ये 200 गुणांची कमाई करणारी पहिली महिला खेळाडू यांग्झी लियूने यूटीटीच्या चौथ्या हंगामातही अपराजित मालिका कायम राखली आणि सुथासिनी सवेत्ताबटवर 2-1 असा विजय मिळवून चेन्नई लायन्सचे आव्हान कायम राखले. मिश्र दुहेरीत अचंता शरत कमल-यांग्झी या जोडीने 2-1 अशा फरकाने हरमीत-सुथासिनी यांचा पराभव करून चेन्नई लायन्सला 5-4 अशी आघाडी मिळवून दिली.
अंतिम निकाल – गोवा चॅलेंजर्स 8-7 चेन्नई लायन्स (हरमीत देसाई 2-1 बेनेडिक्ट डुडा (6-11, 11-4, 11-8); सुथासिनी सवेत्तबट 1-2 यांग्झी लियू (11-7, 6-11, 5-11); हरमीत/सुथासिनी 1-2 शरत कमल/यांग्झी लियू (7-11, 9-11, 11-10); अलव्हारो रॉब्लेस 3-0 शरत कमल (11-8, 11-8, 11-10); रिथ टेनिसन 1-2 सुतिर्था मुखर्जी (7-11, 10-11, 6-11).























































