सरकार चालवण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळ सल्लागार समिती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार घेत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत राज्य कारभार चालवण्यासाठी भाजप कोणता पर्याय निवडणार याबद्दल उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे.भाजपचे केंद्रीय निरीक्षक आपला अहवाल आज राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सादर करण्याची शक्यता आहे.अहवाल प्राप्त झाल्या नंतर शहा दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेत असलेल्या पर्रीकर यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.समितीने दिलेला अहवाल काहीही असला तरी पर्रीकर यांची पसंती निर्णायक असणार आहे.

पर्रीकर यांच्या गैरहजेरीत कोणता पर्याय निवडला जाईल याबद्दल अनेक मतप्रवाह व्यक्त केले जात आहेत.मात्र सगळे पर्याय चाचपून बघितले असता वाद निर्माण न होता फक्त एका पर्यायावर एकमत होईल असं सांगितलं जातंय. यापूर्वी ज्या पद्धतीने मंत्रिमंडळाची एक समिती स्थापन करून तिच्याकडे कारभार सोपवण्यात आला होता, त्यात पद्धतीने यावेळेसही मंत्र्यांची समिती स्थापन करून त्यांच्याकडे सगळी सूत्रं दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे आजच्या घडीला 14 आमदार आहेत.त्यातील मुख्यमंत्री पर्रीकर,वीज मंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रांसिस डिसोझा आजारी असून विविध ठिकाणच्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.त्यामुळे सभागृहात केव्हा बहुमत सिद्ध करायची वेळ आली तर पुरेसे संख्याबळ असावे यादृष्टीने देखील भाजप चाचपणी करत आहे.
काँग्रेस मधील काठावर असलेल्यांना भाजपमध्ये खेचणे किंवा मगो,गोवा फॉरवर्ड पैकी एका पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करणे याचीही चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्रीपद मिळाले तर मगो आणि गोवा फॉरवर्ड पक्ष त्याला नकार देण्याची शक्यता कमी वाटते. सरदेसाई यांनी तर आपण आपल्या पक्षाबरोबर अपक्ष आमदारांना सोबत घेऊन काम करु शकतो याचे संकेत भाजपच्या पक्षनिरीक्षकांना दिले आहेत. आता या पर्यायातून योग्य पर्याय निवडणे हे भाजपच्या नेत्यांसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे.