
सहकारक्षेत्रात जिह्याची आर्थिक नाडी आणि वार्षिक दोन हजारहून अधिक कोटींची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)ची रणधुमाळी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी तसेच सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीकडून आज उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. दोन्ही आघाडीत घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आल्याने ठरावधारक शेतकरी कोणाच्या ताब्यात गोकुळचा कारभार देणार हे 2 मे रोजी होणाऱया मतदानातून समोर येणार आहे.
विरोधी गटाच्या पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आज प्रथम पत्रकार परिषद घेऊन राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या विविध प्रवर्गातून 21 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तर सत्ताधारी गटाच्या वतीने आमदार पी. एन. पाटील, महादेव महाडिक तसेच माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी उमेदवारांची यादी घोषित केली.
दरम्यान, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेव महाडिक, अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्ताधारी गटानेही पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी जाहीर केली. विरोधकांचे सर्व आरोप एकटे पी. एन. पाटील यांनी खोडून काढले. याशिवाय कोणीही उत्तरे दिली नाहीत. एरव्ही प्रत्येक वेळी आव्हानांची भाषा करणारे महादेव महाडिक यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला; पण शेवटपर्यंत त्यांनी बोलणे टाळले.
सत्ताधारी गटाचे उमेदवार
n विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे (ता. आजरा), बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, प्रतापसिंह पाटील, रणजित पाटील (पाचजण ता. करवीर), राजाराम भाटळे, रवीश पाटील, पांडुरंग धुंदरे (तिघे ता. राधानगरी), धैर्यशील देसाई, धनाजी देसाई, विलास कांबळे (तिघे ता. भुदरगड), रणजितसिंह वि. पाटील, अंबरीशसिंह घाटगे (दोघे ता. कागल), चेतन नरके, विश्वास जाधव (दोघे ता. पन्हाळा), सदानंद हत्तरकी, प्रकाश चव्हाण (दोघे ता. गडहिंग्लज), दीपक पाटील (ता. चंदगड), अनुराधा पाटील (ता. शाहूवाडी) आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शौमिका महाडिक (ता. हातकणंगले).
विरोधी गटाचे उमेदवार
n विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, संभाजी पाटील (सर्व ता. करवीर), अरुण डोंगळे, अभिजित तायशेटे, किसन चौगले (तिघे ता. राधानगरी), अजित नरके, अमरसिंह पाटील (दोघे ता. पन्हाळा), नवीद हसन मुश्रीफ, वीरेंद्र संजय मंडलिक (दोघे, ता. कागल), नंदकुमार ढेंगे, रणजितसिंह पाटील (दोघे ता. भुदरगड), कर्णसिंह गायकवाड (ता. शाहूवाडी), महाबळेश्वर चौगुले, विद्याधर गुरबे (ता. गडहिंग्लज), माजी आमदार सुजित मिणचेकर (ता. हातकणंगले), बयाजी शेळके (ता. गगनबावडा), सुष्मिता पाटील (ता. चंदगड), आणि अंजना केदारी रेडेकर (ता. आजरा).
‘गोकुळ’च्या सत्ताधारी गटाकडून नियमांचे उल्लंघन
n सत्ताधारी गटाने मेळावा आणि पत्रकार परिषद कावळा नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी खचाखच सभागृह भरून गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियम येथे अक्षरशः पायदळी तुडवले गेले. सर्वसामान्यांवर कारवाई करणारे पोलीस, महापालिकेचे कर्मचारी मात्र इकडे फिरकलेही नाहीत.































































