
इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत आहे. सोमवारी सोन्याच्या किमतीत तब्बल 12 हजार रुपयांनी घसरण झाली, तर चांदी 31 हजार रुपयांनी घसरली आहे. सोन्याचांदीच्या दरात घसरण होत असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात किमती येत असल्याचे चित्र दिसत आहे. सोन्याचांदीच्या किमती कमी होत असल्याने बाजारात पुन्हा एकदा खरेदीचा ट्रेंड वाढण्याची चिन्हे आहेत.
सोमवारी 10 ग्रॅम सोने 12 हजार 77 रुपयांनी घसरून प्रति तोळा 1 लाख 35 हजारांपर्यंत खाली आले आहे. काल सोन्याची किंमत प्रति तोळा 1 लाख 47 हजार रुपये इतकी होती, तर सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या किमती 30 हजार 864 रुपयांनी घसरून प्रति किलो 2 लाख 1 हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. शुक्रवारी चांदीची किंमत 2 लाख 32 हजार रुपये किलो होती. इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे सोने अवघ्या 24 दिवसांत 23 हजार 956 रुपयांनी तर चांदी 65 हजार 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्यामध्ये या वर्षीच्या सुरुवातीला मोठी वाढ पाहायला मिळाली होती, परंतु काही आठवड्यांत नफा वसुलीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण व्हायला सुरुवात झाली होती. 31 डिसेंबर 2025 ला सोने 1 लाख 33 हजार रुपये प्रति तोळा होते. ते 29 जानेवारी 2026 ला म्हणजे अवघ्या एका महिन्यात 1 लाख 76 हजार उच्चांकावर पोहोचले होते. त्यामुळे सोने उच्चांकावरून 41 हजार रुपये स्वस्त, तर चांदीचा दर 3 लाख 86 हजारांवरून 2 लाख 1 हजारांपर्यंत खाली आला आहे.
उच्चांकावरून नीचांकाकडे घसरण
सोने
29 जानेवारी – 1,76,121 रुपये
10 फेब्रुवारी – 1,56,255 रुपये
20 फेब्रुवारी – 1,54,438 रुपये
10 मार्च – 1,60,188 रुपये
20 मार्च – 1,47,218 रुपये
23 मार्च – 1,35,141 रुपये
चांदी
29 जानेवारी – 3,85,933 रुपये
10 फेब्रुवारी – 2,59,100 रुपये
20 फेब्रुवारी – 2,45,564 रुपये
10 मार्च – 2,70,944 रुपये
20 मार्च – 2,32,364 रुपये
23 मार्च – 2,01,500 रुपये
























































