
गेल्या वर्षी सोन्याचांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. मात्र, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यात मोठी घट झाली. त्यानंतर अमेरिका, इस्रायल इराण युद्धामुळे सोनेचांदीच्या दरात मोठी चढउतार होत होती. आता अमेरिका इराणमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी झाल्याने सोनेचांदीच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे.
दोन्ही देशातील शस्त्रसंधीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा भाव सध्या २४४,७७० प्रति किलोग्राम आहे. ही अंदाजे ६% किंवा १३,००० ची वाढ दर्शवते. तर सोन्याच्या दरात ३,६०० ची वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅम १५३,९४४ वर पोहोचला आहे, ही अंदाजे २.४% ची वाढ आहे. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड २.३% ने वाढून $४,८११.२६ प्रति औंसवर पोहोचले आहे. यूएस गोल्ड फ्युचर्समध्येही ३.३% ची वाढ झाली असून, ते $४,८४० प्रति औंसवर बंद झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत केलेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचा परिणाम आज सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याचांदीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील मोठी घसरण देखील या तेजीला हातभार लावत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे १५-२०% च्या मोठ्या घसरणीमुळे जागतिक बाजारात जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यामुळे कमी दरात सोने आणि चांदीची खरेदी वाढली आहे.
तेलाच्या कमी किमतींमुळे, महागाई कमी होण्याची आशाही वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये तेजीची आशा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दर ५.२५% वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारातील तेजीच्या काळात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये, २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे १,५३,८१० आणि १,४०,९९३ प्रति १० ग्रॅम आहे. येथे चांदीचा भाव २,४४,५२० प्रति किलोग्रॅम आहे.


























































