Gold Silver Rate Today – चांदीची घोडदौड सुरुच, दर अडीच लाखांपार; सोन्यात किंचित घसरण

सरत्या वर्षात सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली. सोन्याची दीड लाखांकडे वाटचाल सुरू असतानाच चांदीनेही चमक दाखवली. चांदीची घोडदौड सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही दिसली आणि चांदीने अडीच लाखांचै ऐतिहासिक टप्पा पार केला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या दरात मोठी वाढ झाली, तर सोन्याच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली. सोमवारी बाजार उघडताच चांदीचा भाव प्रति किलो 14 हजार रुपयांहून अधिक वाढला. त्यामुळे चांदीचा दर 2,54,174 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

गेल्या आठवड्यात अवघ्या चार दिवसांत चांदी 32 हजार रुपयांनी महागली होती. बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा दर 2 लाख 39 हजार 787 वर पोहोचला होता. त्यात आता एका दिवसात 14 हजार 387 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या तुलनेत सोन्याच्या दरात सोमवारी किंचित घसरण झाले.

सोमवारी सोने 372 रुपयांनी स्वस्त झाले. एमसीएक्सवर सोने 1 लाख 39 हजार 501 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. ही घसरण सोन्याच्या वाढलेल्या एकूण किमतीच्या तुलनेत कमी असली, तरी ग्राहकांसाठी हा थोडा दिलासा मानला जात आहे.

चांदी सुस्साट का?

– जगातील सर्वात मोठा चांदी उत्पादक देश असलेल्या चीनने 1 जानेवारी 2026 पासून चांदीच्या निर्यातीवर कडक निर्बंध घालण्याची तयारी केली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत चांदीचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.
– इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने किमती वाढत आहेत.
-अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळत आहेत.