
सामना प्रतिनिधी । वडवणी
शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या विशाल शिंदे यांच्या ‘पार्थ ज्वेलर्स’मधून अज्ञात चोरट्यांनी दुकानात ठेवलेली बॅग पळवली. या बॅगमध्ये तब्बल ५० हजार रोख व दहा ते बारा तोळे सोने असा एकूण जवळपास चार लाख रूपयांचा माल गेला आहे.
विशाल भगवान शिंदे यांच्या मालकीचे मुख्य मार्गावर ‘पार्थ ज्वेलर्स’ हे दुकान आहे. सोमवारी सकाळी ते व त्यांचे वडील नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. हातातील बॅग दुकानामध्ये ठेऊन साफसफाई करण्यास व्यस्त झाले. त्यानंतर बघीतले असता बॅग गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच शहर ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदरील दुकानात सीसीटीव्ही नसल्याने आरोपींबाबत काही थांगपत्ताच नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.



























































