देशाच्या खजिन्यातून 1.28 लाख कोटींचे सोने गायब, रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीने अर्थविश्वात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीने अर्थविश्वात खळबळ उडवून दिली आहे. या आकडेवारीनुसार, देशाच्या सुवर्ण खजिन्यातून तब्बल 14 अब्ज डॉलर्सचे सोने गायब झाले आहे. अर्थात, सोन्याच्या साठय़ाचे मूल्य 1.28 लाख कोटी रुपयांनी घटले आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठवडाभरात हा बदल झाला आहे.

आरबीआयने परकीय चलन साठय़ाची आकडेवारीदेखील जाहीर केली आहे. त्यानुसार हिंदुस्थानच्या परकीय गंगाजळीतही मोठी घट झाली आहे. मागील चार आठवडे परकीय चलन साठय़ात मोठी वाढ झाली होती. या काळात हा साठा 36.97 अब्ज डॉलरने वाढून 723.774 अब्ज डॉलरवर पोहोचला. हा आजवरचा उच्चांक होता. आता हा साठा 6.711 अब्ज डॉलरने घटून 717.064 अब्ज डॉलरपर्यंत घसरला आहे.

ऐतिहासिक चढउतार

सोन्याच्या साठय़ातील चढउतार हा आरबीआयच्या अहवालाचे वैशिष्टय़ ठरला आहे. गेल्या आठवडय़ात सोन्याच्या साठय़ात 14.595 अब्ज डॉलर्सची लक्षणीय वाढ झाली. या आठवडय़ात 14.208 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत झालेले बदल आणि सोने खरेदी-विक्रीबाबतचे आरबीआयचे धोरणात्मक निर्णय ही यामागची मुख्य कारणे असू शकतात असे तज्ञांचे मत आहे.

चलन मालमत्तेचा दिलासा

सोने आणि परकीय गंगाजळीत मोठी घट झाली असली तरी परकीय चलन मालमत्तेत (एफसीए) लक्षणीय सुधारणा झाली आहे. या आठवडय़ात, एफसीए 7.661 अब्ज डॉलरने वाढून 570.053 अब्ज डॉलर झाला आहे. मागील आठवडय़ात त्यात 493 दशलक्ष डॉलरची घसरण झाली होती. एफसीएमधील या बदलामध्ये डॉलरच्या तुलनेत युरो, पौंड आणि येनसारख्या इतर चलनांच्या मूल्यातील चढउतारांचा समावेश आहे.

घसरणीमागील संभाव्य कारणे

तज्ञांच्या मते, युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारांमुळे अलीकडच्या आठवडय़ात परकीय चलन साठय़ात वाढ झाली आहे. गेल्या चार आठवडय़ांत त्यात एकूण 36.97 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि चलन विनिमय दरातील अस्थिरता थेट परकीय चलन साठय़ावर परिणाम करत असल्याने सध्याची घसरण ही एक सुधारणा म्हणून पाहिली जात आहे.