गुड न्यूज…मान्सून कोकणात दाखल, चार दिवसांत मुंबईत एण्ट्री

प्रचंड उकाडय़ाने अंगाची काहिली होत असताना सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला मान्सून अखेर महाराष्ट्रात डेरेदाखल झाला असून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणच्या विविध भागांत जोरदार सरी बरसल्या. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यास वातावरण पोषक असून पुढील तीन ते चार दिवसांतच पावसाची मुंबई एंट्री होणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी दिली. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रासाठी ‘गुड न्यूज’ मिळाली आहे.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत प्रचंड उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भ-मराठवाडय़ात पाऱयाने अक्षरशः 45 अंशांचा आकडा पार केल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. यामुळे बीड, अकोल्यात चक्क दिवसाची संचारबंदी प्रशासनाने लागू केली. असे असताना महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची सुखद बातमी आली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. येत्या 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भात पाच दिवस ‘यलो अलर्ट’

विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस मान्सूनपूर्व वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांशी सर्वच जिह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱयाचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी पावसाचे 6 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले आहे. कोकणातील रत्नागिरी, सोलापूरसह आणि पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले आहेत. पूर्व किनारपट्टीही मान्सूनने व्यापली आहे.
कृष्णानंद होसाळीकर, पुणे हवामान विभाग