Google@20; ‘टीन एज’ सरलं, आली तारुण्याची तरतरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरातील अब्जावधी लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक, तंत्रज्ञानाच्या युगातील क्रांतीकारक गुगलचं ‘टीन एज’ सरलं असून त्याला आता तारुण्याची तरतरी आली आहे. आज गुगलचा 20 वाढदिवस असून या वाढदिवसा निमित्त कंपनीने एक खास व्हिडीओमधून जगभरातील आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गुगलने आपल्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने आपला इतिहास अगदी झटपट दाखवला असून जगभरातील महत्वाच्या भाषांमधून कसे आणि काय-काय सर्च केले जातं हे अगदी थोडक्यात दाखवलं आहे.

आज जगभरातील अवघे काही टक्के लोक असतील ज्यांची गुगलशी ओळख नाही. एवढी दमदार कामगिरी गेल्या 19 वर्षात गुगलनं केली आहे. सर्च इंजिन ते अब्जावधींच्या जीवनातील ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड’ असा मोठा टप्पा गुगलनं अगदी कमी वेळात गाठला आहे. एखादं अक्षर (लेटर), अंक चिन्ह किंवा चित्र काही जरी टाईप केलं तरी त्यासंबंधीत हजारो लिंक शोधून गुगल पुढ्यात आणून ठेवतं. आज गुगल सर्च इंजिनसोबत जी-मेल सर्व्हिस, युट्यूब, गुगल प्लस, गुगल ड्राइव्ह, गुगल मॅप्स, गुगल न्यूज, कॅलेंडर, ट्रान्सलेटर, फोटो सेव्हर अशा अनेक सेवा पुरवते. अनेकविध प्रकारची माहिती गुगलकडे उपलब्ध होते. सतत नाविन्य देणाऱ्या संकल्पाना आणि प्रयोगशिलता यामुळे गुगल लोकप्रिय आहे. तसेच स्पर्धेच्या काळातही आपली अग्रगण्यता टिकवून आहे.

गुगलची थोक्यात माहिती

गुगलची स्थापना लॅरी पेज (Larry Page) व सर्गेई ब्रिन (Sergey Brin) यांनी सप्टेंबर ७, १९९८ रोजी केली. गुगल हे नाव ‘Googol’ या मूळ इंग्रजी नावावरून आलं आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येला Googol असं संबोधलं जातं. गुगलचं मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू इथं आहे. एरिक श्मिट (Eric Schmidt) हे गुगलचं मुख्य कार्यकारी अधिकारी होते. १० ऑगस्ट २०१५, पासून सुंदर पिचाई (Sundar Pichai) गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.

summary : google 20th birthday