
हिंदुस्थानी वंशाचे आणि गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे आवाहन केले आहे. गूगलच्या मूळ कंपनी अल्फाबेटच्या एका अलीकडील बैठकीत (ऑल-हँड्स मीटिंग) त्यांनी हे आवाहन केलं आहे. यावेळी पिचाई यांनी म्हणाले आहेत की, कंपनीला सध्याच्या AI क्रांतीच्या काळात अधिक कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक आहे.
यावेळी सुंदर पिचाई म्हणाले की, “जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या काळातून जाता, तेव्हा सामान्यतः मनुष्यबळ वाढवले जाते. परंतु, या AI युगात आपल्याला या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन अधिक उत्पादकता साध्य करायची आहे.” ते म्हणाले, कंपनीला आपल्या संसाधनांचा काटकसरीने वापर करून अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनण्याची गरज आहे.
दरम्यान, गूगलने 2025 मध्ये AI क्षेत्रात 85 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, जी गेल्या वर्षीच्या 75 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत मोठी वाढ आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने AI मॉडेल्स आणि साधनांना समर्थन देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर केंद्रित आहे. पिचाई यांनी स्पर्धेच्या बाबतीतही भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही जगातील इतर कंपन्यांशी स्पर्धा करत आहोत. काही कंपन्या या AI युगात कर्मचारी उत्पादकतेच्या बाबतीत अधिक कार्यक्षम होत आहेत. त्यामुळे आपल्यालाही यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.”































































