
कौटुंबिक वादातून पित्याने मुलाची पाण्यात बुडवून हत्या केल्याची घटना गोराई येथे घडली. या प्रकरणी गोराई पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोराईच्या कुलवेम बीचवर बुधवारी पोलिसांना अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आला होता. तो मुलगा साधारण 10 ते 13 वयोगटातील होता. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मृत मुलाची ओळख पटावी म्हणून त्याचा फोटो मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील पोलीस ठाण्यांना पाठवला. चौकशीदरम्यान मालवणी पोलीस ठाण्यात एक मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्याची माहिती गोराई पोलिसांना मिळाली. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. गोराई पोलिसांनी त्या मुलाच्या पालकांना तो मृतदेह दाखवला. तेव्हा मुलाच्या आईने तो मृतदेह ओळखला आणि पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून मुलाच्या पित्याला अटक केली.




























































