गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत अंशत: बाधित कुटुंबांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत अंशत: बाधित कुटुंबांनाही पुराच्या पाण्याचा धोका असल्यामुळे या कुटुंबांचे ऐच्छिक पुनर्वसन करून त्यांना राहण्यासाठी भूखंड आणि त्यांच्या सध्या राहात असलेल्या घराचा मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाला दिले. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे लवकर पाठविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.

या निर्णयामुळे गोसीखुर्दमधील अंशत बाधित गरीब कुटुंबांनाही दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण ३८ गावांमधील २३७१ कुटंबांचा ऐच्छिक पुनवर्सनाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. शक्यतो गावाच्या वरील बाजूला असलेल्या जागांमध्येच या कुटुंबांचे पुनवर्सन करा. या कुटुंबांना भूखंड वाटप, नागरी सुविधा, रस्ता, वीज, पाणी या सुविधा देता येतील अशा पध्दतीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अंशत बाधित गावे नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आहेत. या कुटुंबांना आज ना उद्या पुनर्वसन करून द्यावेच लागणार आहे.

अंशत: बाधितांमध्ये जो शेतकरी आहे त्याला १८०० चौ. फूट व बिगर शेतकरी कुटुंबाला १५०० चौ. फुटाचा भूखंड देण्याच्या दृष्टीने किती जमीन लागेल, याचा हिशेब काढा. ऐच्छिक पुनवर्सनासाठी १०० टक्के कुटुंबांची संमती असेल तरच भूसंपादन करावे असेही पालकमंत्री यांनी सांगितले. घराचा मोबदला म्हणून सानुग्रह अनुदान देण्याचे या प्रस्तावात नमूद करावे. तसेच ज्या कुटुंबांचे पुनर्वसन झाले. पण शेती बाधित नाही, अशा कुटुंबांना आपली शेती वाहण्यासाठी दूरपर्यंत जावे लागते. अशा शेतकर्‍यांची शेतीही ऐच्छिक भूसंपादन म्हणून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. या जमिनीची शासनाला गरज नाही. त्यामुळे भूसंपादनाचा नियम येथे लागणार नाही. रेडिरेकनरच्या दराने ही शेती शेतकर्‍यांनी दिली तरच ही जमीन घेता येईल.

भंडारा शहर बायपास रोड
भंडारा शहर बायपास रोड गोसीखुर्दच्या बंडवर करण्यात आला. पाण्याने रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रस्ता असून १२ कोटी खर्च करून डांबरीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्यानंतर हा रस्ता सिमेंटचा करण्यासाठ़ीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सां. बां. विभागाला देण्यात आल्या. तीन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता असून या रस्त्यामुळे वाहतुकीसाठी अनेकांना दिलासा मिळणार आहे.