
मोदी सरकारने एक-एक करून सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता सरकारने एलआयसीचे आणखी साडेसहा टक्के शेअर्स विकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरता असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून एलआयसीचे शेअर्सही घसरल्याचे दिसले.
सरकार ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून एलआयसीमधील काही शेअर्स विकणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये जेव्हा एलआयसीचा आयपीओ आला होता. तेव्हाही सरकारने साडेतीन टक्के हिस्सेदारी विकली होती. आता पुन्हा सरकारने आपली हिस्सेदारी कमी करण्यास मंजुरी दिल्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दरम्यान, सेबीच्या नियमानुसार कोणत्याही लिस्टेट कंपनीची किमान 25 टक्पे पब्लिक शेअर होल्डिंग असायला हवी. एलआयसीचा सरकारकडे अजूनही 96.5 टक्के हिस्सा आहे.
एलआयसीचे अधिक शेअर्स बाजारात विकले गेले तर शेअरचे मूल्य आणखी घसरेल असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. गेल्या एक महिन्यांत कंपनीचे शेअर 3 टक्क्यांनी घसरले. वर्षभरात 10 टक्के तर गेल्या सहा महिन्यांत तब्बल 28 टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे.