ओटीपीसाठी लाडक्या बहिणींची तासंतास रखडपट्टी;केंद्रचालक, अंगणवाडी सेविकांनाही मनस्ताप

विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खोके सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. मात्र जव्हारमध्ये या योजनेला मरगळ आली आहे. सरकारी पोर्टल लुडकल्याने ओटीपी चुकीचा असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे हजारो महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ओटीपीसाठी तासन्‌तास रखडपट्टी होत असल्याने घरची तसेच शेतीची कामे रखडल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. याबरोबरच कागदपत्रे अपलोड करताना आपले सरकार केंद्रातील केंद्रचालक व अंगणवाडी सेविकांचीदेखील फरफट होत आहे.

कागदपत्रे केंद्रावर जमा करून १० दिवसांनी फेरी मारली तरीही नोंदणी झालेली नाही. आता तर र अॅप व पोर्टल दोन्ही चालत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला हप्ता आम्हाला मिळावा यासाठी राज्य शासनाने पोर्टल सुरळीत करावे. • जयश्री पादिर (वंचित महिला)

जुलै महिन्याच्या सुरुवातीला अॅपवर नोंदणी सुरळीत झाली. परंतु जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्टच्या सुरुवातीस मात्र अॅप माहिती स्वीकारत नाही. आता पोर्टल आले परंतु तेदेखील सुरळीत चालत नाही. महिलांची गर्दी वाढत असल्याने दुसरे कामही करता येईना.सचिन चौरे (केंद्रचालक)

राज्यात मिंधे सरकारने मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना राज्यात कॉपी पेस्ट केली. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सचिन चौरे (केंद्रचालक) जुलै महिन्यापासून अर्ज नोंदणी सुरू झाली. सुरुवातीला नारीशक्ती दूत अॅप नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. यानंतर तांत्रिक अडचणींमुळे अॅप बंद करण्याची वेळ शासनावर आली. त्यानंतर शासनाकडून पोर्टल उपलब्ध करून देण्यात आल्याने महिलांनी एकच झुंबड केली. दरम्यान नोंदणीसाठी ओटीपी दाखल केला तरीदेखील पोर्टल मात्र इनव्हॅलीड ओटीपी असा संदेश येऊ लागल्याने जव्हार तालुक्यातील लाभार्थी महिलांसह आपले सरकार केंद्र चालक आणि अंगणवाडी सेविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांना दिवस रात्र नोंदणी ठिकाणी ठिय्या मांडावा लागत असून याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.