
मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये आणि पालिकेची रुग्णालये, शाळा आणि वॉर्ड ऑफिस इमारतींसह सर्व आस्थापनांचे नव्याने फायर ऑडिट केले जाणार आहे. सोमवारी माझगाव येथील ‘जीएसटी’ भवनला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याने पालिका प्रशासनाने सतर्व राहण्यासाठी पुन्हा फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पालिकेची सर्व मोठी रुग्णालये, शाळा, सार्वजनिक वास्तूंची अग्निसुरक्षा सक्षम ठेवण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीत अग्निसुरक्षेचा आढावाही घेण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांच्यासह पालिकेच्या चारही रुग्णालयांचे अधिष्ठाता, यांत्रिकी-विद्युत खात्याचे प्रमुख अभियंता, अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे आदी उपस्थित होते. अग्निशमन दलाने सर्व विभागांशी योग्य समन्वय साधून अग्निसुरक्षेचे पुन्हा ऑडिट करावे, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. इमारतींमध्ये अग्निसुरक्षेसाठी काही अतिरिक्त बाबी करावयाच्या असल्यास तसे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गैरवापर टाळण्यासाठी सिलिंडरचा लिलाव करणार
गेल्या सहा महिन्यांत पालिकेच्या सर्व 24 विभागांमधून 11 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आल्याची माहिती या वेळी अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दिली. दरम्यान, ही कारवाई करूनदेखील संबंधित गॅस वितरण कंपन्यांकडून हे सिलिंडर पुन्हा कापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जप्त केलेले गॅस सिलिंडर जप्त झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावता येण्यासाठी लिलाव करता यावा, याकरिता धोरणाचा मसुदा तयार करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन उपायुक्तांना दिले.
अशी होणार कार्यवाही…
आपत्ती व्यवस्थापनासाठी पालिकेच्या सर्व विभाग व खात्यांनी आपापल्या स्तरावर मॉक ड्रिल नियमितपणे घ्यावे. निरुपयोगी सामान, भंगार वस्तू, जुनी कागदपत्रे इत्यादींची विल्हेवाट संबंधित नियमांनुसार व यथायोग्य प्रकारे नियमितपणे लावावी.
प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांनी पालिकेच्या सर्व इमारतींमधील विद्युत यंत्रणा व वायरिंगसंबंधित नियमांनुसार प्रमाणित असल्याची व त्या कार्यरत असल्याची नियमितपणे तपासणी करून घ्यावी.































































