रायगडात सरकारच्या बांबू प्रकल्पालाच ‘बांबू’, लाखो रुपये पाण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी सरकारने लाखो रुपये खर्च करून बांबू लागवड प्रकल्प हाती घेतला खरा, पण या प्रकल्पालाच ‘बांबू’ लागला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा बांबू प्रकल्प मोठ्या उत्साहात सुरू केला असला तरी प्रत्यक्षात त्याचा बोजवारा उडाला आहे. या प्रकल्पांतर्गत खर्च करण्यात आलेले लाखो रुपये पाण्यात गेले असून महाडमधील डिस्प्ले व्हॅन धूळ खात पडून आहे. हा संपूर्ण प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

पर्यावरणाचे रक्षण व्हावे व स्थानिक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातर रायगड जिल्ह्यातील बांबू क्लस्टर योजना सुरू करण्यात आली. तब्बल एक कोटी बांबूची लागवड जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात येणार होती. त्यासाठी रोपेही तयार केली. शासकीय जमिनीसह खासगी जमिनीवरदेखील या रोपांची लागवड केली. पडीक जमिनी तसेच बांधावरसुद्धा बांबूची लागवड करण्यासाठी मान्यता दिली होती, पण ही योजना सपशेल बारगळली आहे.

बांबू क्लस्टर योजनेची माहिती रायगडातील सर्व भागात पोहोचावी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माजी वसुंधरा योजनेंतर्गत खास डिस्प्ले व्हॅन तयार केली होती. त्यात बांबूची लागवड का व कशी करायची याची माहिती दिली जाणार होती. चित्रफितीद्वारे या व्हॅनमधून मार्गदर्शनदेखील करता यावे अशी व्यवस्था त्यात केली होती, पण गेल्या वर्षभरापासून ही डिस्प्ले व्हॅन महाडच्या शासकीय विश्रमगृहाजवळ अक्षरशः धूळ खात पडून आहे. ही व्हॅन कोणत्या भागात फिरली, नेमके कसले प्रबोधन केले याची चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

लेखाजोखा मांडलाच नाही

गेल्या आर्थिक वर्षात रायगड जिल्ह्यात बांबू क्लस्टर योजनेंतर्गत 35 लाख बांबूची लागवड करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला होता. काही ठिकाणी ही लागवडदेखील केली, पण पूर्णपणे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्यात एक कोटी बांबूची लागवड करण्यात येणार होती. त्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार होते, पण प्रत्यक्षात या कामाचा लेखाजोखा अद्याप मांडण्यात न आल्याने बांबू प्रकल्पालाच ‘बांबू’ लागला आहे.