स्वामी गोविंददेव गिरीमहाराज म्हणतात, आयात लोकांमुळे संघ प्रदूषित होतोय!

‘गंगा शुद्ध आहेच; पण ती नाल्यांनी प्रदूषित केली. त्याचप्रमाणे संघाच्या कार्याची व्याप्ती वाढल्याने आयात झालेल्या लोकांमुळे संघ प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते,’ असे वक्तव्य अयोध्येतील श्रीराम ‘जन्मभूमी न्यासा’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले आहे.

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यातील काही नेते सुरुवातीपासून भाजप आणि संघाचे कट्टर विरोधक राहिले आहेत. मात्र, राजकीय फायद्यासाठी ते आता भाजपमध्ये येत आहेत. याच सर्व पाश्र्वभूमीवर गोविंददेव गिरी महाराजांनी हे वक्तव्य केले. ‘मृत्युंजय भारत’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी गोविंददेव गिरीजी म्हणाले, ‘मला कधी कधी वाटते, संघामध्येही संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगवेगळ्या तोंडांतून जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्यांना कधी संघ आणि हिंदुत्व पटलेले नव्हते. ज्यांना नैतिकता कशाशी खातात, हेदेखील कळलं नव्हतं. अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली आहे. त्यामुळे गंगा तर शुद्धच आहे; पण ती नाल्यांनी प्रदूषित केली. त्याचप्रमाणे संघ प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते. त्यामुळे संघाने फार सावध राहण्याची आवश्यकता आहे.’