
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे हादरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आता जनतेची आठवण होऊ लागली आहे. त्यामुळे जीएसटी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत टीव्ही, पॉवर बँक, कॉम्प्युटर, चित्रपटांच्या तिकिटासह 33 वस्तुंवरील जीएसटी दरात कपात केली आहे. 1 जानेवारी 2019 पासून नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. नववर्षात लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना मोदी सरकारकडून ‘पॉवर बँक’ तयार करण्याचा हा प्रयत्न आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषदेची 31 वी बैठक आज झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अर्थमंत्री जेटली यांनी माहिती दिली.
पेट्रोल, डिझेलची सातत्याने दरवाढ होत असल्याने इंधनाला ‘जीएसटी’च्या कक्षेत आणावे अशी अनेक दिवसांची मागणी आहे. परंतु आजच्या 31व्या जीएसटी परिषदेतही यावर निर्णय झालेला नाही.
सिनेमा तिकिटाचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त असतील तर जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. 100 रुपयांपेक्षा कमी तिकिटासाठी 18 ऐवजी आता 12 टक्के जीएसटी.
28 टक्क्यांवरून 18 टक्के – मॉनिटर्स, 32 इंची टीव्ही, टायर्स, पॉवर बँक, डिजिटल कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम
28 टक्क्यांवरून 5 टक्के – अपंग व्यक्तींसाठी खुर्ची, सायकल, वॉकर आणि इतर उपकरणे.
33 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. त्यात 7 वस्तूंवरील 28 टक्के जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे. 26 वस्तूंवरील जीएसटीचा दर 18 टक्क्यांवरून 12 किंवा 5 टक्के केला आहे. काही सेवांवरील जीएसटी कमी केला किंवा काढून टाकला आहे.
























































