
>> मिलिंद देखणे
अहिल्यानगर जिह्यातील सौंदाळा हे गाव सामाजिक सुधारणांचे ‘मॉडेल व्हिलेज’ ठरत असून नुकतेच या गावाने ‘माझी जात-मानव’ या संकल्पनेला अनुसरत ‘जातमुक्त गाव’ करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
अहिल्यानगर हा अतिशय चळवळीचा असलेला जिल्हा. सहकाराची मुहूर्तमेढ या जिह्यामध्ये रोवली गेली. संत ज्ञानेश्वरांनी नेवासा या ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने माणुसकीचे दर्शन घडवून जगापुढे आदर्श ठेवला आहे. या गावाने जातिवाचक न बोलण्याचा निर्णय घेतला. तसा ठरावही केला आहे.
सौंदाळा गावाने एकत्रित येत केलेल्या संकल्प व ठरावांची चर्चा सर्वत्र होत आहे. कष्टकरी व हमालांचे कैवारी असलेल्या व कम्युनिस्ट चळवळीमध्ये अग्रेसर असलेल्या बाबा आरगडे यांचा मुलगा शरद आरगडे यांनी या गावाचा वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. या गावात रोज सकाळी राष्ट्रगीत लावले जाते. सायंकाळी सहा ते आठ या वेळेला होणारा भोंगा मुलांना अभ्यास करण्याची सूचना देतो. मुलींकरता गावाने अनेक उपक्रम राबवले आहेत. बारावीच्या मुलींना मोफत पुस्तके, वह्या व साहित्य पुरवणे, मुलींच्या लग्नासाठी पाच हजार रुपये, मागासवर्गीय मुलींच्या उच्च शिक्षणासाठी अकरा हजार रुपये असे निर्णय गावाने घेतले आहेत.
भारतीय समाजव्यवस्थेत ‘जात’ ही संकल्पना इतकी घट्ट रुजलेली आहे, मात्र सौंदाळा या गावाने एक ऐतिहासिक क्रांती घडवून आणली आहे. येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ‘जातमुक्त गाव’ करण्याचा अधिकृत ठराव मंजूर केला असून संपूर्ण गाव केवळ ‘मानवता’ हाच धर्म मानणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला एक नवीन दिशा मिळाली आहे. सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत जातमुक्तीचा प्रस्ताव मांडला आणि त्याला सर्व ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दिला. या ठरावानुसार गावात यापुढे जात, धर्म, पंथ किंवा वंशाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. विशेष म्हणजे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले जाणार असून असे विवाह सन्मानाने लावले जातील. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना आणि सामाजिक उत्सवांमध्ये कोणाचीही जात विचारली जाणार नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करून गावाने आधुनिक काळातील धोकेही ओळखले आहेत.
सौंदाळा गाव हे सामाजिक सुधारणांचे ‘मॉडेल व्हिलेज’ ठरत आहे. या गावाने यापूर्वी ‘शिवीगाळमुक्त गाव’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सभ्य भाषेचा वापर व्हावा आणि येणाऱया पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी गावाने हा शिस्तीचा नियम घालून दिला आहे. तसेच विधवा प्रथा निर्मूलन, विधवा पुनर्विवाहाला चालना असे धाडसी निर्णय घेतले आहेत. गावच्या विकासात शिक्षणाला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारणे असो किंवा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष उपक्रम राबवणे असो, ग्रामस्थ नेहमीच लोकसहभागातून पुढे असतात. स्वच्छतेच्या बाबतीतही गावाने शिस्त जोपासली असून सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन येथे पाहायला मिळते.
‘माझी जात-मानव’ ही संकल्पना केवळ कागदावर मर्यादित न ठेवता ती आचरणात आणण्यासाठी सौंदाळा सज्ज झाले आहे. जात नष्ट झाली पाहिजे असे केवळ भाषणांमधून सांगण्यापेक्षा सौंदाळा गावाने प्रत्यक्ष कृतीतून आदर्श निर्माण केला आहे. देशातील प्रत्येक गावाने जर सौंदाळाचा हा ‘माणुसकीचा पॅटर्न’ स्वीकारला पाहिजे.
> ‘आम्ही गावांमध्ये चांगले निर्णय घेतलेले आहे. समाजामध्ये चांगला संदेश जावा हा त्यामागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे आम्ही ग्रामस्थ सर्वजण एकत्रपणे येऊन निर्णय घेतो व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. या नियमांची अंमलबजावणीसुद्धा आम्हालाच करायची असल्यामुळे आम्हाला आतापर्यंत अडचण आली नाही. आम्ही सर्व ग्रामस्थ सविस्तर चर्चा करून मगच निर्णय घेतो. त्यामुळे हे सगळे श्रेय माझे नाही तर सर्व गावाचे आहे.’
– सौंदळा गावचे सरपंच शरद आरगडे



























































