ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे भीक मागो आंदोलन; जिल्हा परिषदेवर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सप्टेंबर ते नोव्हेंबर 2019 या तीन महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने संतप्त ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी भीक मागो आंदोलन केले. हा प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना नगरच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मोर्चात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांकडून भीक जमा केली असून ही रक्कम ग्रामविकास मंत्रालयाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बुरुडगाव रोड येथील भाकपच्या कार्यालयापासून संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात झाली. आंदोलकांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेवर वळवला. यावेळी कर्मचार्‍यांनी झोळी पुढे करुन भीक जमा केली. तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडून जोरदार निदर्शने केली. 7 डिसेंबरच्या बैठकीत मागील तीन महिन्यांचे वेतन अदा करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानंतर संघटनेने पाठपुरावा करुन वेतनासाठी स्मरणपत्र देखील दिले. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याने 15 दिवसानंतर सोमवारी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी भीक मागो आंदोलन करीत जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. तीन महिन्याचे वेतन थकल्याने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, ऑनलाईन पगार असल्याने कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम दिली जात नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जीवन जगणे अवघड झाले असून, राहणीमान भत्ता सुद्धा हातावर मोजण्याइतक्याच लोकांना मिळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या मागणीचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज पाटील व उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. विभाग) निखीलकुमार ओसवाल यांना देऊन चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची व्यवस्थित माहिती व कागदपत्र संकलित न केल्याने बरेच कर्मचारी वेतनापासून वंचित आहे. तर ऑनलाईन बिघाडाचा फटकाही त्यांना बसत आहे. यामुळे कर्मचार्‍यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नसल्याची बाब अ‍ॅड. टोकेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. मुख्यकार्यकारी अधिकारी पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे थकित वेतन मिळण्यासाठी बीडीओ यांना पत्र काढण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मारुती सावंत, सुरेश कोकाटे, राहुल पटेल, संजय डमाळ, सुनिल शिंदे, शरद खोडदे, उत्तम कराडे, अरुण राऊत, किरण फटांगरे, भाऊसाहेब गिरवले, ब्राम्हणे, रविंद्र पवळ, दादा कापसे, दिलीप बोरुडे, दादा साळवे, रोहिदास पेटारे, संपत चाबुकस्वार, गणेश शिंदे, संतोष अल्हाट, अनिल शिंदे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.