
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क होऊ शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणे समान अधिकार असतो. माझ्या आईचा आजोबांच्या संपत्तीवर हक्क आहे. त्यानुसार नात म्हणून माझाही आजोबांच्या मालमत्तेवर अधिकार आहे, असा दावा एका नातीने केला होता.
न्या. शैलेश ब्राम्हणे यांच्या एकल पीठाने हा दावा फेटाळून लावला. वडिलांच्या संपत्तीवर मुलगा किंवा मुलगी दावा करू शकते. तसा कायदा आहे. नातीने आजोबांच्या संपत्तीवर अधिकार सांगावा, असा कोणताही कायदा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
2005 नंतर मुलींना अधिकार
हिंदू मिताक्षरी कायद्यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा अधिकार होता. या कायद्यात 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणेत मुलींना वडिलांच्या संपत्तीवर हक्क देणारी तरतूद करण्यात आली.
नात वंशज नाही
मुलाचा मुलगा आजोबांचा वंशज असतो. मुलीची मुलगी आजोबांची वंशज होत नाही. या नातीचा आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
काय आहे प्रकरण
या आजोबांना चार मुले व चार मुली आहेत. यातील एका मुलीच्या मुलीने ही याचिका केली होती. माझ्या आईने तिच्या वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार सोडलेला नाही. त्यामुळे मलाही या संपत्तीत वाटा हवा, अशी मागणी नातीने केली होती.




























































