ग्रंथयात्रा – लीळाचरित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अर्चना मिरजकर

चक्रधर स्वामींच्या लोकविलक्षण आयुष्याची कहाणी, त्यांचे उपदेश, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथाचा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ‘लीळा’चरित्राचे मराठी साहित्यात मोठे स्थान आहे. त्याचबरोबर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पटच या ग्रंथात उलगडलेला आपल्याला पाहायला मिळतो.

साधारण 900 वर्षांपूर्वी, गुजराथमधील भडोच नावाच्या राज्यात मल्लदेव राजा राज्य करीत होता. त्याचा प्रधान विशाळदेव आणि त्याची पत्नी म्हाळसाई यांना हरपाळदेव नावाचा अतिशय सुस्वरूप आणि पराक्रमी पुत्र होता. देवगिरीचा राजा सिंघण याने जेव्हा भडोचवर स्वारी केली तेव्हा हरपाळदेवाने मोठा पराक्रम गाजवला. युद्धात त्याच्या कपाळाला जखम झाली आणि त्यातून बरे होताना त्याला आजारी लोकांची शुश्रूषा करण्याचा छंद जडला. पण एक दिवस स्वतःच आजारी पडून हरपाळदेवाचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी जेव्हा त्याला चितेवर ठेवण्यात आले तेव्हा तो अचानक पुन्हा जिवंत झाला. त्याचे जीवन पूर्ववत सुरू झाले, त्याचा आजारी लोकांची शुश्रूषा करण्याचा छंदही कायम राहिला. त्यांचे औषधोपचार करताना त्याच्यावर कर्ज झाले. दुसऱया एका मताप्रमाणे हरपाळदेवाला जुगार खेळण्याचा नाद लागला आणि त्याच्यावर कर्ज ओढवले. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने आपली बायको कमळाइसा हिच्याकडे तिचे दागिने मागितले. बायकोने नकार दिला. हरपाळदेवाला नैराश्य आले. संसाराचा त्याग करून हरपाळदेव रामटेकला आला. तिथे त्याला गोविन्दप्रभू हे सिद्ध पुरुष भेटले. त्यांनी हरपाळदेवाला ईश्वरी साक्षात्काराचा अनुभव करून दिला आणि त्याचे चक्रधर असे नाव ठेवले. त्यानंतर त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली. भोगवती नदीच्या किनारी त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि त्यांनी संन्यास घेतला. उपदेश करीत ते गावोगावी फिरू लागले. त्यांच्या प्रसन्न, प्रेमळ वृत्तीमुळे आणि समानतेच्या उपदेशामुळे त्यांना अनेक शिष्य लाभले. जसजसा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा लोकांवर पगडा बसू लागला तसतशी त्यांची लोकप्रियता वाढत गेली. देवगिरीचा यादव राजा रामदेवराव याची राणी कमाइसा आणि हेमाडपंतांची पत्नी देमती या त्यांच्या शिष्या बनल्या. शेवटी पदयात्रा करता करता, ते एकटे उत्तर दिशेला निघून गेले. इसवी सन 1272 मध्ये त्यांचे निर्वाण झाले असे मानले जाते.

चक्रधर निघून गेल्यावर त्यांच्या आठवणीने त्यांचे शिष्य वेडेपिसे झाले. चक्रधरांशिवाय जिणे त्यांना नको वाटू लागले. सर्व शिष्य एकत्र जमून त्यांच्या आठवणीत रमू लागले. या आठवणी लिहून ठेवाव्यात, असे मनात येऊन त्यांचे शिष्य म्हाइंभट्ट यांनी मोठय़ा परिश्रमाने चक्रधरांच्या सर्व आठवणी गोळा केल्या आणि त्यांचे चरित्र लिहिले. हाच मराठीतील पहिला गद्य आणि पहिला चरित्र ग्रंथ – लीळाचरित्र!

चक्रधर स्वामींच्या लोकविलक्षण आयुष्याची कहाणी, त्यांचे उपदेश, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथाचा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ‘लीळाचरित्रा’चे मराठी साहित्यात मोठे स्थान आहे. त्याचबरोबर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पटच या ग्रंथात उलगडलेला आपल्याला पाहायला मिळतो. संन्यास अवस्थेच्या नियमाप्रमाणे चक्रधर स्वामी सारखे प्रवास करत असत आणि अनेक लोकांच्या संपर्कात येत. या प्रवासाचे वर्णन करताना त्यात ओघानेच त्याकाळची जीवनशैली, रीती-भाती, समाज व्यवस्था, लोकांचे विविध व्यवसाय, राजकारण यांचे विस्तृत चित्रण येते. त्याकाळचे लोक कसे बोलत, काय खात, कपडे कसले वापरत, त्यांच्या उपजीविकेची साधने काय होती, त्यांची करमणुकीची साधने, सणवार, देव-देवता, समजुती आणि अंधश्रद्धा हे सर्व जणू एखादा चित्रपट पाहावा तसे आपल्यासमोर उलगडत जाते.

उदाः सेंदुरणीं गोपाळीं अवस्थान : सेंदुरणीं पूर्वामुख गोपाळाचें देऊळः तेथ अवस्थान दीस 10 : 12 : एकुदीसीं गोसावी वीहरणा बीजें केले : मग बीढारा बीजें करीतां मार्गी पद्मनाभिदेवातें ह्मणीतलें : ‘ पद्मनाभि जा : चणा मागा ’ : ‘ जी जी ’ ह्मणौनि नीगाले : सेतकरीया पासि गेले : तेयांते ह्मणीतलें : ‘ आह्मांसि काइ चणा दीया ’ : निका संभावनीक देखौनि तेणें ह्मणीतलें : ‘ लागे तो घेया जा ’ : गेले : चणा वोलीं घालौनि घेउनि आणिला : रगडवीला : उपणवीला : सर्वज्ञें ह्मणीतलें : तुह्मी एथ आपुलेनि हाते धीडरीं करा ’ : ( शोधु ) ‘ धीडरीं रांधावी ’ : मग तेहीं तैसेंचि केलें : मग तेंही डाळि दळुनि भीजत घातली : वाटित होते : तें देमाइसीं देखीलें : देमाइसीं ह्मणीतलें : ‘ दे : मी करीन ’: मग देमाइसीं धीडरीं केलीं : थोडे ऐसें चणे वीकीले : तांदुळ घेतले: तुप घेतले : उपाहारू निफजवीला : मग गोसावीयांसि पुजा केली : आरोगण : गोसावीयांसि सहपंक्ति भोजनें जाली :गोसावीयांसि गुळळा : वीडा

लीळाचरित्राची भाषा अशी सहज, सोपी आहे. छोटी छोटी वाक्ये आणि बोलीभाषेचा वापर यामुळे त्यात एक सहज सुंदरता आहे. प्रसंगांचे चित्रमय वर्णन आणि संवाद यामुळे त्यात एक जिवंतपणा आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा ग्रंथ भक्तिरसाने ओथंबलेला आहे. महानुभाव पंथाचे लोक चक्रधर स्वामींना कृष्णाचा अवतार मानतात. हरपाळदेव जेव्हा मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाला तेव्हा फलटणचे योगी चांगदेव राऊळ यांच्या आत्म्याने त्याच्या देहात प्रवेश केला असे ते मानतात. द्वारकाधीश कृष्ण, दत्तात्रेय, गोविन्दप्रभू, चांगदेव राऊळ आणि चक्रधर स्वामी असे कृष्णाचे पाच अवतार मानले जातात. चक्रधर स्वामींचे सुंदर रूप, अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्त्व, त्यांचा जातिवर्ण, स्त्र्ााr-पुरुष भेदभाव न मानणारा उपदेश, शिष्यांवरचे त्यांचे प्रेम यामुळे चक्रधर त्यांच्या शिष्यांना अत्यंत प्रिय होते. त्यामुळे त्यांच्या बारीकसारीक गोष्टीही म्हाइंभट्टानी नोंदवल्या. याच स्वामींच्या लीळा आणि म्हणून हे ‘लीळाचरित्र’.

‘लीळाचरित्रा’मुळे मराठीत गद्य वाङ्मयाची परंपरा दृढ झाली. हा ग्रंथ पारमार्थिक तत्त्वज्ञानापासून ते सांस्कृतिक दस्तऐवज म्हणून वाचकाला अनेक स्तरांवर आनंद देतो.

[email protected]