
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’ या मराठी वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक दीपक टिळक यांचे बुधवारी पहाटे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे निधन वृद्धापकाळामुळे झाले, असून मृत्यूसमयी त्यांचे वय 78 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत दरम्यान प्रसिद्ध टिळकवाड्यात जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल.
‘केसरी’चे विश्वस्त संपादक तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशा विविध पदे दीपक टिळक यांनी भूषवली होती. याबरोबरीने त्यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
टिळकांचे कार्य येणाऱ्या नव्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी होते. उत्तम विचारवंत, कुशल प्रशासक तसेच संवेदनशील पत्रकार आणि समाजसेवक होते. त्यांच्या जाण्यामुळे पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. टिळकांचे अंतिम संस्कार दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.