
‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलाश वाघमारे आता आणखी एका आव्हानात्मक भूमिकेतून ‘हिरवी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी लाँच केले आहे. पोस्टरवर कैलाश एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळतोय. पोस्टमध्ये स्कूटरवर आरूढ झालेला कैलाश दिसतोय. बाजूला एमएच 13 महामार्गावरील माईलस्टोन असून त्यावर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला आहे. या चित्रपटात एक हृदयस्पर्शी कथा आहे जी मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधांची रूपरेषा मांडते. मनात, समाजात आणि निसर्गात हिरवळ वाढवण्यासाठीची एक गाथा दर्शवते. एग्नेल रोमन दिग्दर्शित या चित्रपटात कैलाश वाघमारे आणि मीनाक्षी राठोड सोलापूरच्या शिक्षक जोडीची मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘हिरवी’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.























































