
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गाईडसाठी शैक्षणिक पात्रता बारावी करण्यात आली असून मराठी आणि हिंदी भाषेसोबतच इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक केले आहे. देशी-विदेशी पर्यटकांसोबत योग्य संवाद साधला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे देशभरतील पर्यटकांसह विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना सफारीसाठी एक गाईड दिला जातो. हा गाईड आपल्या ज्ञानानुसार पर्यटकांना जंगल आणि प्राण्यांची माहिती देतो. सध्या कार्यरत असलेले गाईड्स माहितीच्या दृष्टीने परिपूर्ण नाहीत. तसेच त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान नाही, अशा तक्रारी नेहमी येत होत्या.
जागतिक पातळीवरचा हा प्रकल्प असल्याने पर्यटकांना याची चांगली माहिती त्यांच्या भाषेत देणे गरजेचे आहे. मात्र तशी माहिती मिळत नसल्याने काही रिसोर्टमालकांनी स्वतःकडे जाणकार ठेवले होते. त्यांना ते पर्यटकांसोबत पाठवायचे. या जाणकारांना वेतनही चांगले मिळते. तर ताडोबाच्या गाईड्सना एक फेरीचे साडेतीनशे रुपये मिळतात. या पार्श्वभूमीवर ताडोबा व्यवस्थापणाने नवीन गाईड घेताना बारावी उत्तीर्ण आणि तिन्ही भाषांचे ज्ञान असणारे घेण्याच ठरवले आहे. सध्याचे गाईड्स ताडोबालगतच्या गावातील आहेत. हाताला काम मिळावे म्हणून गावातील थोड्याफार जाणकार लोकांना गाईड म्हणून आतापर्यंत घेण्यात आले. पण आता सुधारणा केली जाणार आहे. नवीन गाईड्सना घेताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वनगुन्हे असता कामा नये. दरम्यान, या निर्णयाला महाराष्ट्र राज्य गाईड्स युनियनने विरोध दर्शवला आहे.




























































