इराणहून येणाऱ्या बोटीतून २०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त, दोन इराणी नागरिकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात एटीएस (ATS) आणि हिंदुस्थानी तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) अरबी समुद्रात एक मोठी संयुक्त मोहीम राबवून अंमली पदार्थांची तस्करी उधळून लावली आहे. पोरबंदर किनारपट्टीजवळ इराणहून आलेल्या एका संशयास्पद स्पीड बोटमधून २०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, दोन इराणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत अब्दुल मजीद आणि अब्दुल सत्तार या दोन इराणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही अंमली पदार्थांच्या या मोठ्या खेपेसह हिंदुस्थानी समुद्री सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. तपासणीदरम्यान बोटीतून २०३ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हे २०० किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जप्त केलेली पाकिटे फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

इराणचा ड्रग्ज माफिया हाजी फिदा याने ही खेप पाठवली होती आणि ती पंजाबमधील एका हँडलरला सोपवली जाणार होती, असे बोलले जात आहे. सुरक्षा यंत्रणा आता पंजाबमधील त्या हँडलरचा शोध घेत आहेत. जप्त केलेली बोट इराणमध्ये तयार झालेली आहे. ही बोट आणि तस्करांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. हे तस्कर यापूर्वी किती वेळा या मार्गाचा वापर करून हिंदुस्थानात ड्रग्ज घेऊन आले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.