
महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकाही झाल्या. गुजरातमध्ये 6 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांमध्ये 3 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. हा विजय सरकारविरोधी लाटेमुळे किंवा काँग्रेसच्या करिष्म्यामुळे मिळाला नसून तो भाजपमधल्या फंदफितुरीमुळे मिळाल्याचे भाजप नेत्यांना खात्रीलायकरित्या कळाले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी भाजपसाठी गुजरात हे आदर्श राज्य म्हणून नावारूपास आणले होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारली तसेच अमित शहा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आणि आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. या दोघांच्या गुजरातमधून जाण्याने भाजपकडे त्यांच्यासारखे गुजरातवर करडी नजर ठेवणारे नेते उरले नाहीत. याचा परिणाम गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतही दिसला होता आणि आता झालेल्या पोटनिवडणुकीतही दिसून आला आहे.
अहमदाबाद मिरर या इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे की भाजपचा तीन मतदारसंघातील पराभव हा भाजपच्याच काही नेत्यांमुळे झालेला आहे. या पराभवानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पराभवासाठी जबाबदार नेत्यांची नावे शोधायला सुरुवात केली असून त्यांना आतापर्यंत 3-4 नावे कळाली आहेत. या पराभवानंतर गुजरातच्या मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची गच्छंती आता अटळ असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे.
सध्या गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे त्यांची पत्नी अंजली रुपाणी यांच्यासोबत उझबेकिस्तानमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. त्यांच्यासोबत जी माणसे गेले आहेत ती दलाल म्हणून बदनाम आहेत असं या बातमीत म्हटलं आहे. या पराभवाच्या बातमीनंतर रुपाणी हे अडचणीत सापडले असून त्यांना मुद्दाम अडचणीत आणण्यासाठीच पराभव घडवून आणण्यात आल्याचं हे वृत्त देणाऱ्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. रुपाणी हे अकार्यक्षम असून त्यांची प्रशासनावर अजिबात पकड नसल्याचं गुजरातमधील अनेक भाजप नेत्यांना वाटत आहे.
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे ‘खेरालू’ मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी चोखपणे पार पाडत भाजपच्या उमेदवाराचा विजय अगदी सोपा केला होता. पोटनिवडणुकीतील पराभवामुळे विजय रुपाणी यांचे वजन कमी झाले असून नितीन पटेल यांचे वजन वाढले आहे. या राजकीय परिस्थितीमुळेच गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपाणी यांच्या जागी नितीन पटेल यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.
गुजरात पोटनिवडणुकीतील पराभवावर दिल्लीमध्ये चर्चा होणार असून यामध्ये विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात 2022 च्या विधानसभा निवडणुका लढू नये असा सूर आळवला जाणार आहे. रुपाणी यांची अकार्यक्षमता उघड करण्यासाठीच हे पराभव घडवून आणल्याची चर्चा आहे. रुपाणी यांना राज्यसभेवर पाठवावे आणि त्यांच्या जागी सक्षम व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसवावा अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. रूपाणी यांची बायको ही सरकारच्या कामात उगाच हस्तक्षेप करत असल्याचाही गुजरात भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. रुपाणी यांना हटवायचे झाल्यास तीन नावे मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातील पहिले नाव हे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे आहे, दुसरे नाव हे केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांचे आहे आणि तिसरे नाव हे अमित शहांचे आहे. 2022 च्या निवडणुका अमित शहांच्या नेतृत्वात लढल्यास गुजरातमध्ये सहज विजय मिळवता येईल असे गुजरात भाजपच्या अनेक नेत्यांना वाटत आहे.
























































