
गुजरातच्या सूरतमधील राज टेक्सटाईल मार्केटमध्ये बुधवारी भीषण आग लागली. इमारतीचे आठ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सूरतच्या पर्वत पटिया परिसरात बुधवारी सकाळी राज टेक्सटाईल मार्केट या इमारतीला आग लागली. सुरवातीला इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण करत आठ मजले गिळंकृत केले.
अग्निशमन नियंत्रण कक्षाला सकाळी 7.14 वाजता आगीची माहिती मिळाली. त्यानंतर डुंभल, मान दरवाजा आणि दिंडोली अग्निशमन केंद्रातील गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. सुरत अग्निशमन दलाच्या एकूण 22 अग्निशमन केंद्रातील पथके आणि वाहने घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या संकुलात सुमारे 500 दुकाने असल्याचे वृत्त आहे.

























































