20 लाखाची रोकड असलेल्या बॅगेची अचानक चेन उघडली अन् रस्त्यावर नोटा गोळा करण्यासाठी उडाली झुंबड

उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे चोरीची घटना समोर आली आहे. एक व्यापारी 20 लाखांची रोकड घेऊन बसमधून प्रवास करत होता. यादरम्यान एका चोरट्याने पैशाची बॅग पळवली. मात्र पळत असतानाच त्याची बाईक पडली अन् बॅगेची चेन उघडली. यामुळे बॅगेतील 500 रुपयांच्या नोटा महामार्गावर सर्वत्र पसरल्या आणि पैसे गोळा करण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली.

काय आहे प्रकरण?

गुजरात येथील रहिवासी असलेले जीरा व्यापारी भावेश हे बसने प्रयागराजहून दिल्लीला चालले होते. यादरम्यान, कोखराज येथील एका हॉटेलजवळ बस थांबली असता भावेश यांच्या मागच्या सीटवर बसलेला चोरटा पैशांची बॅग घेऊन पळाला. भावेश यांनी आरडाओरडा केल्याने अन्य प्रवासीही त्याच्या मागे धावले. यादरम्यान चोरट्याची बाईक घसरून पडली. यावेळी बॅगेची चेन उघडली आणि 500 रुपयांचे पैशांचे बंडल खाली पडले.

महामार्गावर नोटांचे बंडल पडलेले पाहताच लोकांची पैसे गोळा करायला एकच झुंबड उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. लुटलेले सर्व पैसे व्यापाऱ्याला मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.