येरवड्यात स्वयंघोषित भाईची दहशत; व्यावसायिकांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

येरवड्यात स्वयंघोषित ‘भाई’ने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. पानटपरीचालकाने पानाचे पैसे मागितल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून ‘आम्ही इथले भाई आहोत, पैसे कसले मागतो,’ असे म्हणत धमकाविले. त्याच्याकडून एक हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर एका भेळवाल्याकडून ३०० रुपये काढून घेतले.

नागेश खंडारे, विनोद डोलारे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृपाशंकर हिरालाल जयस्वाल (वय ३८, रा. करुणा हाऊसिंग सोसायटी, येरवडा) यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील आंबेडकर चौकात जयस्वाल यांची पानटपरी आहे. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास नागेश खंडारे, विनादे डोलारे आणि त्यांचे साथीदार आले. यांच्याकडून सिगारेट घेतली; पण पैसे दिले नाहीत. जयस्वाल यांनी पैसे मागितले असता, त्यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घातला. ‘तू आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले भाई आहोत. आम्हाला येथे सर्वजण हप्ता देतात’ असे म्हणत जबर मारहाण केली. पुढील तपास उपनिरीक्षक लोहार करत आहेत.