गुरुदत्तचा ‘प्यासा’ पुन्हा झळकणार, ‘क्लासिक’ कलाकृतीचे 4 के रिस्टोरेशन; 6 ऑगस्टला प्रीमियर शो

‘जाने वो पैसे लोग थे जिनके…, ‘ये दुनिया अगर मिल भी जाए’ अशी अर्थपूर्ण गीते आणि हृदयस्पर्शी कथानकामुळे ‘क्लासिक’ ठरलेला  गुरुदत्तचा ‘प्यासा’ चित्रपट पुन्हा मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान तो थिएटरमध्ये पहायला मिळेल. चित्रपटाचा प्रीमियर 6 ऑगस्ट रोजी होईल. गुरुदत्त यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी आहे.

‘प्यासा’ शिवाय हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. समाजाला थेट प्रश्न विचारणारा ‘प्यासा’ काळाच्या पुढे राहिला. 1957 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात एका संघर्षशील कवीची कथा आहे. यातील गुरुदत्त यांच्या अभिनयाचे सर्वदूर कौतुक झाले. नव्या पिढीपर्यंत हा चित्रपट आता पुन्हा पोचणार आहे. एनएफडीसी आणि नॅशनल फिल्म अका&ईव्ह ऑफ इंडिया यांनी ‘प्यासा’चे 4 के रिस्टोरेशन केले आहे.

प्यासाची जुनी प्रिंट पुनरुज्जीवीत करण्यापुरता हा विषय मर्यादित नाही. इंडियन सिनेमाचा आत्मा जतन करण्याचा प्रयत्न आहे. ही फिल्म नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनच्या उपक्रमांतर्गत रिस्टोर करण्यात आली.

(प्रकाश मगदुम) मॅनेजिंग डायरेक्टर, एनएफडीसी

‘प्यासा’ बद्दल ऐकत मोठे झालो!

गुरुदत्त यांची नात गौरी दत्त म्हणाल्या, ‘प्यासा’ ही त्यांची खूप खास फिल्म होती. सुरुवातीला ‘कश्मकश’ या नावाने फिल्म लिहिली होती. गुरुदत्त यांची दुसरी नात करुणा म्हणाली, ‘प्यासा’च्या कथा ऐकत आम्ही मोठे झालो. गुरुदत्त या चित्रपटात काम करणार नव्हते. त्यांनी मुख्य भूमिका दिलीप कुमार यांना दिली होती.