जालन्यातली तालुका जालना पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा आयशर कंपनीटा ट्रक पकडला असून जवळपास एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली.
तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना अंबड रोडवर अपघात झाल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पो.ना. विष्णु कोरडे, पो.कॉ. लक्ष्माण शिंदे, राम शेंडीवाले, चालक शिवानंद जायभाये यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता कंटेनर क्र. (एच-आर-६३-बी-9058) हे उभे असल्याचे दिसले. सदर वाहनातील वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल नानकचंद ऊर्फ कल्लु बालमीकी (रा. पाठखोरी, ता. फिरोजपुर झिरका, जि. नुहुमेवाद, हरयाणा) असे सांगितले. अधिक विचारपूस केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
संशय आल्याने सदर वाहनास पोलीस ठाणे तालुका जालना येथे नेण्यात आले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला आढळून आला. पोलिसांनी कंटनेरसह 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पो.ना. विष्णु कोरडे, पो.कॉ. लक्ष्माण शिंदे, राम शेंडीवाले, चालक शिवानंद जायभाये यांनी केली आहे.