
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशात लॉक डाऊन करण्यात आल्याने उद्योगांनाही फटका बसला आहे. या परिस्थितीमुळे विकसीत आणि विकसनशील देशांच्या विकासदरात मोठी घट झाली आहे. जगातील सर्वच देशांचा विकासदर घसरण्याची शक्यता असतानाच एका देशाचा विकासदर 2020 या वर्षात 86 टक्के राहणार आहे. दक्षिण अमेरिकेतील गुयाना या देशाच्या विकासदरात मोठी वाढ होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे.
गुय़ानाच्या सीमा ब्राझील, व्हेनेझुएला या देशांना लागून आहे. तशीच या देशाची लोकसंख्या 7.8 लाख आहे. 2019 मध्ये या देशाचा विकासदर 4.4 टक्के होता. मात्र, 2020 मध्ये जगातील सर्व अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता असतानाच या देशाचा विकासदर 86 टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे. गुयानामध्ये तेलाचा मोठा साठा सापडल्यामुळे या देशाचा विकासदरात मोठी वाढ होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. कोरोनाचा फटका गुयानालाही बसला आहे. मात्र, येथे कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी आहे. या देशात कोरोनाचे 47 रुग्ण आढळले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या प्रकोपातून बचावल्याने आणि मोठा तेलसाठा सापडल्याने या देशाचा विकासदर वाढणार आहे.
गुयानामध्ये तेलाचा नवा साठा आढळला असून या देशाच्या राखीव तेलसाठ्याचे प्रमाणही जगात सर्वाधीक आहे. जगात सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या सौदीचा तेलसाठा 1900 बॅरल आहे. तर गुयानाचा साठा 3900 बॅरल आहे. गुयानातील अनेक साठ्याच्या ठिकाणी अद्याप तेल उत्पादन सुरुही झाले नाही. मात्र, गुयानात मोठ्या प्रमाणात नवे तेलसाठे आढळत आहेत. या आर्थिक वर्षात सर्व मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना मंदीचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांचा विकासदरही ढासळत आहे. मात्र, राखीव आणि नव्या तेलसाठ्याच्या जोरावर गुयानाचा विकासदर 86 टक्के राहणार आहे.



























































