ICU मध्ये AC चा स्फोट होऊन आगीचा भडका, एका रुग्णाचा मृत्यू; 10 रुग्णांचा वाचवला जीव

ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. इथल्या जयारोग्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट होऊन आग लागली आणि एकच गोंधळ उडाला. संपूर्ण विभागात धूर पसरला. या दुर्घटनेत अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला तर 10 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

ग्वाल्हेरचे सर्वात मोठे जयारोग्य रुग्णालयच्या ट्रॉमा सेंटरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी घडली. आगीची बातमी पसरताच ट्रॉमा सेंटरमध्ये तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटाच्या आतच 10 रुग्णांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. तसेच विजेचा मेन स्वीच वेळीच बंद करून अग्निशमन दलाला याबाबत माहीती दिली.

घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचून त्यांनी आग नियंत्रणात आणली. त्यानंतर तत्काळ 10 रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले. आगीची माहिती मिळताच जीआरएमसीचे डीन डॉ. आरकेएस धाकड जेएएच अधीक्षक डॉ. सुधीर सक्सेना यांच्यासह अन्य लोक पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रामा सेंटरमध्ये 10 रुग्ण दाखल झाले होते. ट्रामा सेंटरमध्ये सिलिंग एसी लावला होता. मंगळवारी सकाळी अचानक त्यामध्ये स्फोट होऊन आग लागली. हा एसी आझाद नावाच्या रुग्णाच्या भितींवर लागला होता. त्यामुळे तो आगीत होरपळला आणि त्याचा मृत्यू झाला. हा रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता.

अतिदक्षता विभागात स्फोट होऊन आग लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तपास सुरू केला आहे. एसीमध्ये आग कशी लागली आणि स्फोट कसा झाला याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी रुग्णालय प्रशासनसह जिल्हा प्रशासनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.