शालेय स्तरापासून जिम्नॅस्टिक्सची सुरूवात व्हायला हवी! महाराष्ट्र ऍमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांची इच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीपा कर्माकर हिला रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही, पण तिच्या धाडसी व संस्मरणीय कामगिरीमुळे जिम्नॅस्टिक्समध्येही हिंदुस्थानला पदक जिंकता येऊ शकते हे हिंदुस्थानातील युवा खेळाडूंना समजले. या खेळासाठी पोषक असणाऱया सोयीसुविधा हिंदुस्थानात मुबलक प्रमाणात नसल्या तरी दीपा कर्माकरसारखी युवा कन्या ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचते यामध्येच सर्वकाही आले. सामर्थ्य, शक्ती, लवचिकता, सहनशक्ती, चपळता या सर्व गोष्टींचा मिलाफ असलेल्या जिम्नॅस्टिक्सची मुंबईसह महाराष्ट्रातील स्थिती समाधानकारक नाही. काही ठिकाणी या खेळासाठीच्या सुविधा आहेत, पण त्या ‘हायटेक’ नाहीत. याप्रसंगी महाराष्ट्र ऍमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांच्याशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला असता ते म्हणाले, या खेळाची सुरुवात शालेय स्तरापासून व्हायला हवी. आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करतोय, पण या खेळासाठी लागणारी जागा, खर्च इत्यादी परवडत नसल्यामुळे काही शाळा तयार होत नाहीत, तर काही शाळांमध्ये या खेळाबाबतचे बेसिक ज्ञान दिले जाते. ‘मदर ऑफ ऑल स्पोर्टस्’ म्हणून या खेळाला ओळखले जाते. लहानपणापासून मुले किंवा मुलींची पावले याकडे वळल्यास ते पुढे जाऊन कोणताही खेळ खेळू शकतात. हिंदुस्थानच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी हे महत्त्वाचे आहे, असे ते पुढे आवर्जून सांगतात.

खेळाचे पाच प्रकार

जिम्नॅस्टिक्स हा विविध पाच प्रकारांमध्ये खेळला जातो. आर्टिस्टिक, रिदमिक, ऍक्रोबॅटिक, एरोबिक, ट्रम्पोलिन/टम्बलिंग यांचा यामध्ये समावेश आहे. आर्टिस्टिक प्रकार हा मुले व मुली या दोघांसाठी असतो. रिदमिक प्रकारात फक्त मुलींचा सहभाग असतो. ऍक्रोबॅटिकमध्ये मुले व मुलींसह सांघिक गटातही खेळाडू सर्वस्व पणाला लावतात. एरोबिक ट्रम्पोलिन व टम्बलिंगमध्येही त्याचीच पुनरावृत्ती होते, अशा शब्दांमध्ये संजय शेटे या खेळाबाबत सांगतात.

मेडलची आशा नाही पण…

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात या खेळात छान कामगिरी करू शकणारे खेळाडू येत आहेत. अक्षता शेटे, शिप्रा जोशी, पूजा सुर्वे यांसारख्या खेळाडूंनी ठसा उमटवलाय. हिंदुस्थानच्या संघातील निम्मे खेळाडू हे महाराष्ट्रातील असतात, पण अजून मोठा पल्ला गाठायचाय. पायाभूत सोयीसुविधांची कमी आहे. त्यामुळे मोठय़ा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू अव्वल दहामध्ये येऊ शकतात, पण मेडल्स जिंकता येणे मुश्कील आहे अशी खंत संजय शेटे यावेळी बोलून दाखवतात.

या राज्यांमध्ये खेळला जातोय

हिंदुस्थानात जिम्नॅस्टिक्स तेवढय़ा मोठय़ा प्रमाणात खेळला जात नाही, पण महाराष्ट्र, पंजाब, चंदिगढ, दिल्ली, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश व केरळ या राज्यांमध्ये जिम्नॅस्टिक्स बऱयापैकी सुरू आहे. रशिया, अमेरिका, उझबेकिस्तान, जर्मनी, चीन, जपान, रोमानिया हे देश जिम्नॅस्टिक्समध्ये अव्वल आहेत, असे संजय शेटे यांनी पुढे सांगितले.

कॉर्पोरेट सेक्टरने पुढाकार घ्यायला हवा

महाराष्ट्रात भारतीय क्रीडा विद्यामंदिर (वडाळा), समर्थ व्यायाम मंदिर (प्रीमियर रिदमिक क्लब), बालेवाडी (पुणे), संभाजीनगर, डोबिंवली, चेंबूर अशा काही मोजक्याच ठिकाणी या खेळाच्या सुविधा आहेत. आर्टिस्टिकसाठी दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च येतो. तसेच इतर प्रकारांसाठी 70 ते 80 लाखांचा खर्च मॅटपासून इतर बाबींसाठी लागतो. दीपा कर्माकर ही साईच्या केंद्रात सराव करीत होती. त्यामुळे तिला मोठी मजल मारता आली, पण मुंबईसह महाराष्ट्रात जिम्नॅस्टिक्ससाठी पुरेशा सुविधा नाहीत. जिम्नॅस्टिक्ससाठी 10 हजार स्क्वेअर फूटचा हॉल लागतो. आम्ही मुलांकडून तीन हजार स्क्वेअर फूटच्या हॉलमध्ये सराव करून घेतो. यावेळी कॉर्पोरेट सेक्टरकडून मदतीचा हात मिळायला हवा. त्यानंतर या खेळाचा प्रसार व प्रचार होईल, खेळाडू करीअर म्हणून या खेळाकडे पाहतील तसेच आपणही पुढे जाऊ असे संजय शेटे यांना वाटते.

परदेशी प्रशिक्षकांचा खर्च पालक करताहेत

महाराष्ट्रातील खेळाडूंना परदेशातील अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी काही दिवसांसाठी त्यांना येथे घेऊन येतो, पण परदेशी प्रशिक्षकांचा खर्च खेळाडूंच्या पालकांनाच करावा लागतो. असोसिएशन राज्य व राष्ट्रीय स्पर्धांना खर्च करते. त्यामुळे परदेशी प्रशिक्षकांसाठीचा खर्च परवडत नाही, अशी निराशाही संजय शेटे यांनी व्यक्त केली.