एकतर्फी प्रेमातून तरूणीसह कुटूंबियावर जीवघेणा हल्ला , हडपसरमधील काळेपडळ परिसरातील घटना

प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरुन टोळक्याने तरूणीच्या वडीलांवर कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न केला. त्याशिवाय तरूणीसह तिच्या बहिणीलाही मारहाण केली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हडपसरजवळील काळेपडळमधील नेहरु पार्क गल्लीमध्ये घडली.

सौरभ अडागळे, सागर अडागळे, ओम भोसले व रोहीत भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय हडपसरमधील काळेपडळ येथे राहतात. सौरभ अडागळे याचे फिर्यादीच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने मुलीला तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते, मात्र मुलीच्या मनात त्याच्याविषयी प्रेम नसल्याने तिने नकार दिला होता. त्याचा राग मनात ठेवत रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सौरभने फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरडाओरडा करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते.

काळेपडळमधील नेहरु पार्क गल्लीमध्ये आले, त्यावेळी सौरभ व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस अडवून हातातील कोयत्याने फिर्यादीवर वार केला. लाथाबुक्क्यांसह दगडांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या दोन्ही मुलींनाही जबर मारहाण केली. घटनेनंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून ‘आमच्या नादाला कोणी लागू नका, नाहीतर कोणालाही जिवंत सोडणार नाही’, असे ओरडत परिसरामध्ये दहशत निर्माण केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या