
सामना प्रतिनिधी । मालवण
हडी येथे नवतरुण मित्रमंडळ आयोजित खुल्या इंटरवाडा क्रिकेट स्पर्धेत वायरी वारीयर्स संघाने देवबाग संघाचा ९ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मालिकावीर म्हणून विशाल लुडबे (वायरी) याला गौरविण्यात आले.
हडी येथील नवतरुण मित्रमंडळ इंटरवाडा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना वायरी वारीयर्स विरुद्ध देवबाग यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना वायरी संघाने निर्धारित पाच षटकात विशाल लुडबेच्या वैयक्तिक २२ धावांच्या जोरावर ४७ धावा जमविल्या. प्रत्युदाखल खेळताना देवबाग संघ केवळ ३८ धावाच करू शकला.
स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ओंकार लुडबे (वायरी) व उत्कृष्ट फलंदाज म्हणून दर्शन बांदेकर (देवबाग) यांची निवड करण्यात आली. विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे १० हजार व पाच हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत श्याम वाक्कर, अमोल जमदाडे व प्रदीप देऊलकर यांनी समालोचन तर पंच म्हणून आशिष शेलटकर, संतोष मिठबावकर, सुशील शेडगे, अमोल गावकर, सागर पोयरेकर यांनी काम पाहिले.



























































