एचएएल-अमेरिकन कंपनीमध्ये 8,870 कोटींचा करार, हिंदुस्थानला 113 तेजस मार्क-1 इंजिन मिळणार

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) सोबत 1 अब्ज म्हणजेच जवळपास 8 हजार 870 कोटी रुपयांचा करार केला आहे. या कराराअंतर्गत अमेरिकन कंपनी हिंदुस्थानला 113 तेजस मार्क-1 इंजिन देणार आहे. इंजिनसोबत सपोर्ट पॅकेजही पुरवण्याचे काम अमेरिकन कंपनी करणार आहे, असे या करारामध्ये म्हटले आहे.

ही इंजिने 97 मार्क-1ए हलक्या लढाऊ विमानांमध्ये (तेजस लढाऊ विमाने) बसवली जातील. ही इंजिने 2027 ते 2032 दरम्यान वितरित केली जातील, असे एचएएलने कराराची घोषणा करताना एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या कराराआधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 25 सप्टेंबर रोजी एचएएलसोबत 62 हजार 370 कोटी रुपयांचा करार केला आहे. या कराराअंतर्गत एचएएल हिंदुस्थानी हवाई दलासाठी 97 एलसीए तेजस मार्क-1ए लढाऊ विमाने तयार करणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये, सरकारने 83 तेजस मार्क-1ए विमाने खरेदी करण्यासाठी एचएएलसोबत 48,000 कोटींचा करार केला होता.

मिग-21 चा पर्याय

मार्क-1ए विमान हे हवाई दलाच्या मिग-21 ताफ्याचा पर्याय आहे. 26 सप्टेंबरला मिग-21 निवृत्त झाले. 62 वर्षे अखंडपणे सेवा दिल्यानंतर अखेर हे विमान सेवेतून निवृत्त झाले. निवृत्ती आधी हिंदुस्थानी एअर फोर्सने या लढाऊ विमानाला आकाशात नेऊन त्याचा गौरव केला. हे विमान वायुदलासाठी एक योद्धा म्हणून काम करत होते. मिग-21 हे लढाऊ विमान पहिल्यांदा 1963 साली वायुदलाच्या ताफ्यात आले होते. या विमानाने सहा दशके गाजवली. या विमानाला हिंदुस्थानचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान म्हटले जाते. कारण, हे हिंदुस्थानचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान होते.