
>>अरुण
नोव्हेंबरच्या 23 तारखेला इथिओपियातील हेली ज्वालामुखी 12000 वर्षांनी `जागा’ होऊन इतकी आग नि धूर ओकू लागला की त्यातून निर्माण झालेली राख शेकडो किलोमीटर दूर थेट मुंबई-दिल्लीपर्यंत पोचली. आधीच प्रचंड प्रदूषणाने ग्रासलेल्या या शहरांचा श्वास आणखी कोंडला. निसर्गाचा असा दणका कधी बसेल सांगता येत नसतो. माणसाने केलेले प्रदूषण कणाकणाने वाढत असेल तर नैसर्गिक प्रदूषण टनाटनाने पसरते. प्रत्येक वर्षी पृथ्वीवरचे सगळे ज्वालामुखी सुमारे अडीच कोटी टन राख उत्सर्जित करून वातावरण बिघडवतच असतात. त्यामध्ये खडकांची पूड, काही सूक्ष्म स्फटिक, इतर खनिजं आणि ज्वालामुखीतून निघणाऱ्या रसायनांचाही समावेश असतो.
ज्वालामुखीतुन फेकल्या जाणाऱ्या राखेचा कहर झाला होता. ते वर्ष म्हणजे इसवीसन 536. हे जगाचे `कुंद’ वातावरणाचे `पर्व’ होते. त्या वर्षी जगातल्या अनेक ज्वालामुखींमधून एकत्रितपणे एवढी राख पृथ्वीला व्यापून राहिली की पुढचे सुमारे 18 महिने एकप्रकारचं विचित्र धुकं (धुरकं) युरोप, आखाती देश आणि आशिया खंडाला ग्रासून राहिलं. याचा परिणाम असा झाला की, पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी अनेक प्रकारची रोगराई पसरली. माणसं, प्राणी, वनस्पती `श्वसना’च्या विकाराने गुदमरू लागली. त्यातच युरोपात प्लेगने थैमान घातलं.
या `मिस्टोरियस फॉग’ किंवा `गूढ धुक्या’च्या काळात बिघडलेल्या वातावरणाला मुख्यत्वे कारणीभूत होते ते तीन मोठे ज्वालामुखी, एल सॅल्हॅडोरमधील लोपान्गो तसंच उत्तर अमेरिकेतील मोनो ाsढटर्स तसंच ईस्टर्न अॅल्युशियस बेटांवरच्या ज्वालामुखींनी अचानक `आ’वासला आणि ड्रगनसारख्या ज्वाला नि राखेचा भडीमार सुरू केला तो अनेक महिने सुरूच राहिला.
परिणामी, निळी पृथ्वी काळवंडली. प्रखर सूर्यप्रकाशाअभावी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ज्वालामुखीजन्य थंडी किंवा `व्होल्कॅनिक विन्टर’चा अनुभव येऊ लागला. इसवीसन 536 चा ज्वालामुखीचा उद्रेक शमतो न शमतो तोच 540 मध्ये याच ज्वालामुखींनी पुन्हा उत्पात केला. त्यापायी हवेतील सूक्ष्मजल कणांमध्ये सल्फ्युरिक अॅसिडसारखे विषारी पदार्थ मिसळले आणि श्वसनसंस्थांचे विकार अधिकच बळावले.
या कुंद-पर्वामुळे पिकांवरही विपरीत परिणाम होऊन महादुष्काळ पडले. त्यामध्ये लक्षावधी लोकांचा बळी गेला. त्या तुलनेत 2025 च्या इथिओपियन ज्वालामुखी उद्रेकाच्या सपाटय़ातून जगाचा बराच बचाव झाला म्हणायचा. फुप्फुसं, घशांचे आणि डोळय़ांचे विकार वाढले हे मात्र खरं.



























































