
आसावरी जोशी,[email protected]
राणीच्या देशातल्या मुलीच्या एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट. जेमिमा तिचं नाव… 35 वर्षांची जेमिमा. आयुष्यात बरंच काही करायचंय तिला… त्यासाठी आधी तिला स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचंय. आपल्या देशाप्रमाणे परदेशांतील बऱयाच मुली लग्नाला प्राधान्य देतात. त्यासाठी शिक्षणावर पाणीही सोडतात. येथे जेमिमाच्या मागेही तिच्या पालकांनी लग्नाचा तगादा लावला होता…
पण तिला तिची स्वप्नं जपायची होती. पूर्ण करायची होती… आणि आई वडिलांचं मनही दुखवायचं नव्हतं. यातून तिने एक वेगळाच निर्णय घेतला. तिने लग्नासाठी ठिकाण ठरवले. निमंत्रण पत्रिका छापल्या… मित्रमैत्रिणींना बोलावले. आईवडिलांना घेऊन आली. सगळे जमले… उणीव होती फक्त नवरदेवाची. जेमिमाने जाहीर केले की, ती स्वतःशीच विवाहबद्ध होत आहे. येथे तिने जाहीररीत्या वचन दिले की, ‘मी आयुष्यभर स्वतःच्या सोबत राहीन, नेहमी स्वतःला खुश ठेवेन.’ याला परदेशात सोलोगामी विवाह म्हणतात. समारंभपूर्वक स्वतःशीच लग्न करायचे. आपल्याकडे ही प्रथा आलेली नसली तरी स्वतःवर प्रेम करणारी… स्वतःसोबत अत्यंत खूश असणारी बरीच मंडळी मला आपल्या भोवती सापडली.
Happily Single अर्थात स्वखुशीने अविवाहित राहून स्वतःसोबत राहण्याचा पर्याय निवडणाऱयांकडे अजूनही आपल्या समाजात काहीजण भुवई उंचावून पाहतात. या अविवाहित असण्याची तथाकथित विवाहितांकडून सर्रास मस्करीही केली जाते. ‘नक्कीच काहीतरी उणीव असणार’, ‘लग्न जमत नसेल’, ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’, ‘हिच्यातच काहीतरी कमी असणार’ हे आणि असं बरंच काही…
तरीही या सर्व टीकाटिप्पण्यांवर मात देऊन आपल्या मनाप्रमाणे… स्वतःसोबत राहून आनंदी राहणारी… आहे त्या परिस्थितीत आनंद फुलवणारी अनेक अविवाहित मंडळींची मतमतांतरे जाणून घेण्याचा मोह मला आवरला नाही. सोलोगामी विवाह पद्धती बरीचशी अविवाहितांच्या जवळ जाणारी… विवाह.. आयुष्यातील खूप महत्त्वाची घटना. आपल्या सुखदुःखात साथ देणारा, हक्काचा, काळजी घेणारा, समजूतदार जोडीदार प्रत्येकालाच हवासा… अगदी विवाहितांनाही मिळतो असा मनाजोगा जोडीदार…??? प्रत्येकाने खरेपणाने आपल्या मनाला विचारून पाहावे.
मग काहीजण हा जोडीदार स्वतःतच शोधतात. स्वतःतच खूश राहातात. पाहूया मान्यवर अविवाहितांची मतमतांतरे…

ललित प्रभाकर... आजच्या पिढीतील तरुण, देखणा कलावंत. अतिशय मोहमयी, ग्लॅमरस चित्र, नाटय़ क्षेत्रात राहूनही प्रेम, विवाह या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवतोय.
‘मला नेहमीच प्रत्येक बाबतीत खूप प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला सापडत नाहीत तोपर्यंत मी खूप अस्वस्थ असतो. विवाहाबाबत, प्रेम, नातेसंबंधांबाबतही मला खूप प्रश्न पडतात. आपण लग्न कोणासाठी करतो… कशासाठी करतो… या एवढय़ा व्यक्तिगत गोष्टीत बाहेरच्या, परक्या माणसांना का रस असतो… बरीचजणं मनाजोगता जोडीदार सापडला नसतानाही लोक काय म्हणतील… या विचाराने समोर येईल त्याच्याशी लग्न करतात… हे असं का? असे प्रश्न मला नेहमीच पडतात. स्वतःशीच लग्न म्हणजे आपल्या आवडत्या कामाशी… वाढवलेल्या व्यापाशी वचनबद्ध असणं असं मला वाटतं. माझ्याही आईबाबांना वाटतं इतर चार मुलांप्रमाणे आपल्याही मुलाचं लग्न व्हावं… पण त्यांनी त्यांचे विचार माझ्यावर कधी लादले नाहीत.
आपल्याकडे लग्न होऊन आयुष्यात स्थिरता, सुरक्षितता येते असे मानतात, पण मला स्थिर व्हायला आवडत नाही. स्थिरता, सुरक्षितता या गोष्टी आपला विकास थांबवतात असं मला वाटतं. आयुष्य हा एक प्रवास आहे… आणि प्रवास थांबला की आपणही थांबतो. माझ्या दृष्टीने Happiness is Madness. मी स्वतःत रमतो. मला एकटय़ाने प्रवास करायला आवडतो. नव्या लोकांशी मैत्री करायला आवडते. भरपूर मित्रमैत्रिणी आहेत. जोडीदार किंवा प्रेयसी किंवा एखाद्या नात्याची उणीव अजून तरी भासलेली नाही. आई माझ्या प्रत्येक सुखदुःखात जवळची वाटते. फार पुढचा विचार मला नाही करता येत. परिस्थिती जशी समोर येते तसा मी चालत राहातो. माझं माझ्यावर खूप प्रेम आहे… आणि मी माझं आयुष्य भरभरून जगतोय.

रोहिणी निनावे….स्वतःशीच लग्न ही संकल्पना मीही समाजमाध्यमांवर वाचली… आणि ती खूप गमतीशीर कल्पना वाटली. येथे मला ‘क्वीन’ चित्रपटातील कंगनाची आठवण झाली. तीही एकटीच मधुचंद्रासाठी निघते. अर्थात हे निर्णय परिस्थितीजन्य असतात. माझ्या बाबतीतही हेच म्हणता येईल. Happily Single या माझ्यासाठी दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आनंदी राहणं हा माझा स्वभाव आहे… आणि मी अविवाहीत असणं ही त्यावेळच्या परिस्थितीची गरज होती. मी ठरवून असं काही केलं नाही. तेव्हा माझी आई खूप आजारी होती. तिच्यासोबत मी असणं खूप गरजेचं होतं. मग पुढे लग्नाचा विचार मागे पडला तो पडलाच… पण रडत, कुढत बसायला मला आवडत नाही. कोणत्याही परिस्थितीत मी आनंद शोधते. त्यामुळे या अविवाहीत असण्याचाही मी आनंद घेते. स्वतःसाठी जगते, स्वतःशीच माझी बांधिलकी आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण मी समरसून जगते. भरपूर काम करते, पैसे मिळवते, ते स्वतःवर खर्चही करते. अविवाहीत असण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. अमर्याद स्वातंत्र्याबरोबर कधीकधी अस्वस्थ असते. मी स्वतः खूप बडबडी असल्यामुळे मला बोलायला लागतं. त्यामुळे कधीतरी जोडीदाराची उणीव जाणवते. सुख हे मानण्यावर असते. सुखाची स्वतःची संकल्पना वेगळी असते. मानसिक शांतता, आवडीच्या गोष्टी करायला मिळणं, समाधानी असणं म्हणजे सुख. सतत कामात असल्यामुळे फार विचार करायला वेळच मिळत नाही. मला धाडसी जगायला आवडतं. मी बीएमडब्ल्यू गाडी विकत घेण्याचं धाडसही केलं आहे. मी स्वतःशीच वचनबद्ध आहे. स्वतःला सुखी ठेवण्यासाठी… मी स्वतःशीच खूप गप्पा मारत असते. स्वतःलाच ओरडत असते. स्वतःला फिरायला घेऊन जाते. ‘मैं अपनी फेवरीट हूं’ असं म्हणून स्वतःचीच साथ देत असते. स्वतःलाच प्रोत्साहन देणं, स्वतःचे लाड करणं मला खूप आवडतं. आई होणं हे खूप छान असलं तरी माझ्या भाचरंडांनी ती कमी भरून काढली आहे. आता अजून वेगळी जबाबदारी नको वाटते. स्वतः आनंदी राहा. इतरांनाही आनंदी करा… या वाटेने माझी मस्त वाटचाल सुरू आहे

अमृता संत....माझा विवाहसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अगदी लग्नासाठी माझी नावनोंदणीसुद्धा झाली होती. पण जेव्हा माझ्यासमोर मुलांच्या अपेक्षा येऊ लागल्या, तेव्हा त्यातील सरधोपट कल्पनांनी मला धक्काच बसला. एकाने मला सांगितलं, ‘तू अभिनेत्री आहेस. तुझ्या आवडीचं काम करायला मी तुला स्वातंत्र्य देईन.’ या वाक्याने मी खूप अस्वस्थ झाले. स्वातंत्र्य हे मुळातच सगळ्यांना असतं… असलं पाहिजे. मग ते देण्याचा प्रश्नच कुठे येतो? यानंतर लग्न करणं आणि लग्न न करणं यातील Do’s आणि Don’ts मी काढले. आजूबाजूच्या लोकांची लग्नं पाहिली… आणि मला असं वाटलं की, मी माझ्यासोबत जास्त आनंदी, खूश राहू शकते. या निर्णयामुळे मी जास्त कणखर आणि स्वावलंबी झाले. आत्मविश्वास वाढला. काही गोष्टी एकटीने करण्यात खूप आनंद वाटतो. मी एकटीने सिनेमा पाहू शकते. परदेशातही मी एकटी जाऊन आले आहे. सध्या खऱया अर्थाने जगण्याचा अनुभव घेते आहे.
माझी आईबाबा, आजी ठामपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. माझं माझ्या कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे. माझी आई माझी छान मैत्रीण आहे. आनंदी जगणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते मी जगतेय. I am living peacefully and truthfully.
























































