हापुड- चिमुरडीवर बलात्कार प्रकरणी 50 दिवसात निकाल, विकृताला जन्मेठपेची शिक्षा

हापुड येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या एका चिमुरडीवरील बलात्काराच्या प्रकरणात अवघ्या 50 दिवसात निकाल लागला आहे. या घटनेतील विकृताला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, 6 ऑगस्ट 2020 रोजी हापुड येथे दलपत नावाच्या विकृताने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. दहा दिवस पोलिसांनी मोठ्या मुश्किलीने माग काढत दलपतला अटक केली होती. हे प्रकरण हापुड अपर जिल्हा न्यायाधीश आणि पॉक्सो विशेष न्यायालयातील न्यायाधीश बीना नारायण यांच्यासमोर उभं राहिलं होतं. या प्रकरणी बीना नारायण यांनी दलपत याला मरेपर्यंत बंदिवासात राहण्याची शिक्षा ठोठावली आहे. अवघ्या 50 दिवसात या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

काय आहे हे प्रकरण-
6 ऑगस्ट रोजी सायंकाळी पीडिता आपल्या घराबाहेर खेळत असताना दलपत बाईकवरून तिथे आला. त्याने तिचं अपहरण केलं आणि एका शेतात घेऊन गेला. संपूर्ण रात्रभर तिच्यावर त्याने पाशवी अत्याचार केले. पोलीस आणि कुटुंबीय पूर्ण रात्रभर मुलीला शोधत राहिले. सकाळी ही मुलगी एका ग्रामस्थाला शेतात बेशुद्धावस्थेत सापडली. तिची अवस्था खूपच गंभीर होती.

दलपत फरार झाला होता. पोलिसांना चकवण्यासाठी त्याने आपले कपडे आणि एक सुसाईड नोट गंगेच्या किनाऱ्यावर ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी गंगेत उडी मारून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. पण, पोलिसांना ही चिठ्ठी खोटी वाटल्याने त्यांनी शोधमोहीम सुरूच ठेवली. त्याच्यावर अडीच लाखांचं बक्षीसही ठेवलं. अखेर दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणारा दलपत त्यांच्या तावडीत सापडला. त्याला अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या