क्रिकेट कधीच सोपं नसतं! मांजरेकरच्या विराट टीकेचा हरभजनकडून समाचार

विराट कोहली हे नाव घेताच हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये चर्चा आपोआप पेटते. त्यातच अलीकडे माजी कसोटीपटू संजय मांजरेकरच्या एका विधानाने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. कोहलीने कसोटी क्रिकेट सोडून एकदिवसीय प्रकार निवडला, कारण तो खेळायला सर्वात सोपा आहे, असे विधान त्याने केले. या वक्तव्यावर आता माजी फिरकीपटू हरभजन सिंगने त्याच्यावर जोरदार हल्ला केला असून क्रिकेट कधीच सोपं नसतं असं म्हणत विराट कोहलीच्या कारकिर्दीला आणि सातत्याला जोरदार पाठिंबा दिला आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना हरभजन सिंग मांजरेकरवर तुटून पडला. कसोटी असो, एकदिवसीय असो किंवा टी-20. क्रिकेटचा कोणताही प्रकार सोपा नसतो. धावा काढणे ही प्रत्येक पातळीवर कठीणच बाब असते. जर फलंदाजी इतकी सोपी असती तर प्रत्येक खेळाडू सातत्याने धावा करताना दिसला असता. सातत्य राखणाऱया खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी त्यांचे काwतुक व्हायला हवे, असेही हरभजनने मांजरेकरला ठणकावून सांगितले.

हरभजन सिंग विराटचे नेहमीप्रमाणे कौतुक करताना म्हणाला, तो हिंदुस्थानचा सर्वाधिक विश्वासार्ह सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. कोणताही प्रकार असो, कोहलीने नेहमीच संघासाठी मोठे आणि निर्णायक योगदान दिले आहे. तो एकच प्रकार खेळो किंवा तिन्ही प्रकार, त्याच्या क्षमतेवर शंका घेणे म्हणजे क्रिकेटची जाण नसल्याचे लक्षण असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. मोठय़ा सामन्यांत दबावाखालीही कोहलीने संघाला विजय मिळवून दिला आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे, असेही हरभजन म्हणाला. दरम्यान, संजय मांजरेकरने आपल्या व्हिडीओत सध्याच्या काळात एकदिवसीय क्रिकेट अव्वल क्रमांकाच्या फलंदाजांसाठी तुलनेने सोपे झाले असल्याचे मत व्यक्त केले होते. क्षेत्ररक्षणातील निर्बंध आणि गोलंदाजांच्या मर्यादा यामुळे सलामीवीरांना कसोटीपेक्षा अधिक मोकळीक मिळते, असा त्याने युक्तिवाद केला आहे. मात्र हरभजनच्या ठाम भूमिकेमुळे हा वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.