ओव्हरहेड वायरवर बेल्ट फेकल्याने हार्बर ठप्प, ऐनगर्दीच्या वेळी 18 फेऱ्या रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कमरेचा चामडी पट्टा ओव्हरहेड वायरवर भिरकावून दिल्याने सर्किट ट्रीप होऊन वायरच तुटल्याने हार्बरची वाहतूक बुधवारी सकाळी ऐनगर्दीच्या वेळी दीड तास ठप्प झाली. त्यामुळे हार्बरच्या 18 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मानखुर्द येथे कोणी तरी खोडसाळपणे कमरेचा पट्टा भिरकावून ओव्हरहेड वायरवर टाकल्याने हार्बरची पनवेलच्या दिशेला जाणारी वाहतूक साडेसहाच्या सुमारास ठप्प झाली. त्यामुळे विशेष ब्लॉक घेऊन ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्याने गर्दी वाढत असतानाच थोडय़ा वेळाने अप दिशेच्या सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलही बंद पडल्या. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात मध्य रेल्वेच्या तंत्रज्ञांना यश आले. तरी या गोंधळामुळे हार्बरच्या सेवांना फटका बसून 18 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. हार्बरवरील प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून आपापले कार्यालय गाठण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी बेस्टच्या बसेस आणि टॅक्सीचा आधार घेतला.

“ओव्हरहेड वायरवर कोणी तरी बेल्ट टाकल्याने पेंटोग्राफमध्ये स्पार्किंग होऊन सर्किट ट्रीप झाले. त्यामुळे ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यासाठी पॉवरब्लॉक घ्यावा लागला. त्यानंतर सेवा सुरळीत झाली”. – ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी