
>> वरद चव्हाण
हार्दिक जोशी अर्थात सगळय़ा प्रेक्षकांचा राणादा. मूळचीच व्यायामाची आवड अभिनयापर्यंत घेऊन आली.
नमस्कार फिटनेस फ्रिक्स! आपला आजचा लेख एका अशा सेलिब्रेटीचा आहे, ज्याला कुठल्याच परिचयाची गरज नाही! ज्यांनी स्वतःच्या स्टारडमचा प्रवास ‘तुझ्यात जीव रंगला’ म्हणून केला खरा, पण संपूर्ण महाराष्ट्राचा जीव ज्याच्यात रंगला आहे. त्या ‘हार्दिक जोशी’च्या फिटनेसचं रहस्य मी तुमच्यासमोर सादर करत आहे! खरं तर मी आणि हार्दिक 6-7 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भेटलो होतो. काही मित्र असे असतात ज्यांच्याबरोबर आपण वारंवार बोलत नसलो तरीही जेव्हा आपण त्यांना हाक देतो तेव्हा ते लगेचच आपल्यासाठी धावून येतात. 6-7 वर्षानंतर जेव्हा या लेखासाठी म्हणून हार्दिकला व्हॉटस् ऍप केल्यावर दुसऱया मिनिटाला हार्दिकचा फोन आला आणि मी माझ्या प्रश्नांचा पाऊस पाडायला सुरुवात केली.
शाळेत असताना खो-खो, कबड्डी, क्रिकेट व सर्व मैदानी खेळ प्रचंड प्रमाणात खेळले जात असत. पण हार्दिकच्या बाबांना व्यायामाची प्रचंड आवड. शिवाय आपल्या मुलांनी व्यायामाकडे विशेष लक्ष द्यायलाच हवं असं हार्दिकच्या आईला वाटत असे. हार्दिकच्या आठवणीनुसार त्याने साधारणपणे 9वीत असताना व्यायामाची सुरुवात केली. हे अर्थातच घरगुती व्यायाम होते. सूर्यनमस्कार, जोरबैठका, दंडबैठका हे व्यायामाचे प्रकार सुरुवातीला कठीण जरी वाटत असले तरीही बाबांच्या बरोबरीने आणि आईच्या प्रोत्साहनाने हार्दिकचा व्यायाम हळूहळू रूळावर येऊ लागला, पण व्यायामाची आवड घरापर्यंतच सीमित राहिली नाही. हार्दिकची 10वीची परीक्षा झाल्या झाल्या जेव्हा इतर मुलं मैदानाकडे किंवा गावी धाव घेतात तेव्हा मात्र वरील कुठलाही पर्याय न निवडता हार्दिकने व्यायामशाळेत जाण्याचा पर्याय निवडला. आता व्यायामामध्ये खूप शिस्त आली होती. हार्दिकची उंचीही वाढत होती. एकंदरीतच हळूहळू हार्दिकचा व्यक्तिमत्त्वविकास होऊ लागला आणि महाविद्यालयामध्ये असतानाच हार्दिक मॉडेलिंग करू लागला. मॉडेलिंगला मिळणारा प्रतिसाद उत्तमच होता. हार्दिकचा स्वतःवरचा व व्यायामावरचा विश्वासही वाढतच होता. एक आवड म्हणून मॉडेलिंग करणं आणि इंडियन आर्मीमध्ये जाऊन हिंदुस्थानची सेवा करण्याचं हार्दिकचं स्वप्न होतं, पण देवाने हार्दिकसाठी एक वेगळाच मार्ग निवडला होता. ‘हापूस’ नावाच्या मराठी चित्रपटात हार्दिकचा एक मित्र ‘हापूस’च्या व्ही.एफ.एक्स. (स्पेशल इफेक्ट) टीमचा एक भाग होता. त्यांनी हार्दिकला एका छोटय़ाशा भूमिकेसाठी विचारलं. हार्दिकने होकार दिला आणि आयुष्यात पहिल्यांदाच कॅमऱयासमोर उभा राहीला, पण त्याच दिवशी हळूहळू हार्दिकच्या लक्षात आलं की तो कुठल्याही विशेष भूमिकेसाठी नाही तर एक ‘ज्युनिअर आर्टिस्ट’ म्हणून उभा आहे, पण अभिनयाचं दार उघडण्यासाठी हार्दिकला आलेला हा अनुभव पुरेसा होता. व्यायाम सतत चालू होताच शिवाय एक चांगली भूमिका मिळण्यासाठीचा स्ट्रगलसुद्धा चालू होता. व्यायाम चालू असल्यामुळे त्याला एक अशी भूमिका मिळाली ज्या भूमिकेमुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं. ती भूमिका म्हणजे अर्थातच ‘तुझ्यात जीव रंगला’!
एक उत्तम संधी आणि यश मिळालं खरं, पण हार्दिकला त्याची किंमतसुद्धा मोजावी लागली. घरच्यांपासून लांब जाऊन कोल्हापुरात शूट करायचं होतं, याशिवाय स्वतःचा व्यायाम व आहाराकडे लक्ष द्यायचे होते. 2-3 महिन्यांहून जेमतेम 2-3 दिवस हार्दिकला घरी जायला मिळत. कोल्हापुरातल्या ‘‘मसल ऑफ इट’’ आणि ‘मसल’ या व्यायाम शाळेत अभिजित आणि सुनील यांच्या मार्गदर्शनाखाली हार्दिक त्याचे डाएट प्लान व वर्कआऊट डिझाइन करतो. आज या मालिकेला जवळजवळ 3 वर्षं होत आहेत. याच मालिकेसाठी हार्दिकला तीन वेगवेगळय़ा भूमिका साकारायला मिळाल्या. राणा दा, राजा राजगोंडा आणि कॉन्स्टेबल रणविजय गायकवाड! पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही भूमिकांसाठी हार्दिकने स्वतःच्या अभिनयावरच नाही तर शरीरावरसुद्धा मेहनत घेतली. राणाची भूमिका कुस्तीपटूची असल्यामुळे हार्दिकने 15 किलो वजन वाढवलं होतं तेच आता रणविजय गायकवाड या भूमिकेसाठी 15 दिवसांत 8 किलो वजन त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली कमी केले. अर्थात या मेहनत व जिद्द यांचा मोलाचा वाटा आहे.
सकाळी 9 ची शिफ्ट असली तर सकाळी 6 वाजता व्यायामशाळेत जाऊन दीड ते 2 तास व्यायाम करणं. मग 9 ते 10-11 पर्यंत शूट करणं, जेमतेम 4-5 तास झोपणं. कधी-कधी 7 ची शिफ्ट असली तर संध्याकाळी 7-8 ला पॅकअप झाल्यावर रूमवर न जाता थेट व्यायामशाळेत जाऊ व्यायाम करणं. कष्ट तर नक्कीच खूप करत आहे हार्दिक आणि ते तो करू शकतोय कारण रसिकांकडून त्याला शाबासकीची थाप मिळत आहे म्हणूनच. आहाराचं विचाराल तर हार्दिकला खरं तर शाकाहारी जेवण जास्त आवडतं, पण या भूमिकेसाठी त्याने चिकन, मटण, अंडी जास्त प्रमाणात त्याला खावं लागलं. रोज शूटला जाताना प्रोटिन शेक्स, प्रोटीन बार्स, फळं, सुकामेवा हार्दिक घेऊन जातो. आता जेव्हा तो राणाची भूमिका करत होता तेव्हा अरबट-चरबट खाणं सोडून सर्व प्रकारचे पौष्टिक अन्न खात होता तेव्हा चिकन, मटण, अंडी हे जास्त प्रमाणात खाल्लं जात असे, पण आता गायकवाडच्या भूमिकेसाठी त्याने हे सगळं कमी केलं आहे. मटण बंद कारण मटणात एक्स्ट्रा फॅट्स असतात. थोडय़ा प्रमाणात चिकन, 4-5 अंडी, भात बंद, नाचणीच्या भाकऱया. थोडक्यात सांगायचं झालं तर हार्दिक सध्या अत्यंत हेल्दी डाएटवर आहे. कोल्हापुरात असे अनेक डाएट क्लब्स आहेत जे आपल्या गरजेनुसार आपल्याला टिफिन बनवून देतात. इतके दिवस बाहेर राहिल्यावर आपण प्रत्येकजण घरचं जेवण खूप मिस करतो. घरी आल्यावर तुपातली पोळी, बटाटा काचऱयाची भाजी, हिरवी चटणी, वरण, भात हा हार्दिकचा अत्यंत आवडता बेत. हार्दिक अशीच मेहनत करून त्याला अधिक यश मिळत जावो अशी प्रार्थना करतो.


























































